वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या जातीबाबत विचारणा केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत या मुद्यावर भाष्य केले होते. याच मुद्याला धरून अखिलेश यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्याची जात कशी काय विचारता येईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींच्या जातीच्या मुद्यावरून अखिलेश यादव यांनी संसदेत आवाज उठवला असला तरी, इतरांची जात विचारल्याबद्दल सोशल मीडियावर खुद्द सपा प्रमुखांवरही निशाणा साधला जात आहे. अखिलेश यादव यांच्या अशाच एका जुन्या विधानावर खुद्द भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत असताना भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या भाषणावर जोरदार प्रत्युत्तर दिले. याचदरम्यान त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जात विचारली. या संपूर्ण प्रकरणावर राहुल गांधींची बाजू घेत अखिलेश यादव यांनी आपण जात विचारू शकत नाही, असे साध्या शब्दांत सांगितले.
किरेन रिजिजू यांनी केला अनुराग ठाकूर यांचा बचाव
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचा बचाव केला आहे. तसेच त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसने जे केले त्याचा मी निषेध करतो, ते कायम जातीबद्दल बोलत असतात. राहुल गांधी देश आणि संसदेपेक्षा मोठे आहेत का? असा प्रश्नही संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला.
काँग्रेसने जे केले त्याचा मी निषेध करतो, ते नेहमीच जातींबद्दल बोलत असतात. ते पत्रकार आणि लष्करातील कर्मचाऱ्यांच्या जातींबद्दल विचारतात. ते प्रत्येकाची जात विचारत राहतात. त्यांना लोकशाही आणि देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करायची असून त्यांना अराजकता आणि हिंसाचार पसरवायचा आहे, असेही ते पुढे म्हणाले.