वृत्तसंस्था /लखनौ
उत्तर प्रदेशातील सर्व पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरत आहेत. याचदरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी आपला पुतण्या आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव कन्नौज मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवतील आणि आम्ही त्यांच्या विजयासाठी मते मागू, असे सपा नेते शिवपाल यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले. इंडिया आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव नक्कीच करेल, असा आशावाद सपा नेते शिवपाल यादव यांनी व्यक्त केला. तर मध्य प्रदेशात मोहन यादव मुख्यमंत्री झाल्याबद्दल शिवपाल यादव यांनी त्यांचे अभिनंदन करत ‘तुम्ही मध्य प्रदेश सांभाळा, आम्ही उत्तर प्रदेश सांभाळू’, असेही जाहीर केले.
उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभा जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप नेते सुब्रत पाठक यांनी डिंपल यादव यांचा पराभव केला होता. त्याआधी कन्नौज जागेवर समाजवादी पक्षाचे वर्चस्व होते. कनौज मतदारसंघातून यापूर्वी दिवंगत मुलायमसिंह यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनीही या जागेवर निवडणूक जिंकली आहे. आता या जागेवर अखिलेश निवडणूक लढवतात की नाही हे पाहायचे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपाने पाच जागा जिंकल्या होत्या. यामध्ये मुरादाबादमधून एस. टी. हसन, रामपूरमधून आझम खान, संभलमधून शफीकुर रहमान बुर्के, मैनपुरीमधून दिवंगत मुलायमसिंह यादव आणि आझमगडमधून अखिलेश यादव विजयी झाले होते. मात्र, त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत सपाला दोन जागा गमवाव्या लागल्या होत्या.









