वृत्तसंस्था/ रामपूर
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी पक्षाचे वरिष्ठ नेते आझम खान यांची भेट घेतली आहे. दीर्घकाळानंतर झालेल्या या भेटीला पक्षाच्या गोटात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मी तुरुंगात आझम खान यांना भेटू शकलो नव्हतो, परंतु आता आलो आहे. आझम खान आमच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
आझम खान आणि त्यांच्या परिवाराला बनावट गुन्ह्यांमध्ये गोवण्यात आले आहे. समाजवादी पक्ष नेहमीच स्वत:च्या जुन्या सहकाऱ्यांसोबत उभा आहे. मी यापूर्वी त्यांना भेटण्यासाठी पोहोचू शकलो नव्हतो, याचमुळे आज त्यांच्या घरी पोहोचून विचारपूस करण्यासाठी आलो आहे. आझम खान अत्यंत जुने नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत असल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे.
या भेटीला पक्षात जुन्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. अलिकडच्या काळात आझम खान यांचे मौन आणि सप नेतृत्वापासून त्यांनी राखलेल्या अंतरामुळे वेगळा राजकीय अर्थ काढला जात होता. अखिलेश यांची ही भेट हे अंतर दूर करण्यासाठी पुढाकार असल्याचे मानले जात आहे.
रामपूरच्या राजकारणात आझम खान नेहमीच समाजवादी पक्षाचे महत्त्वाचे चेहरे राहिले आहेत. मुलायम सिंह यादवांच्या काळापासून ते पक्षाचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जात राहिले आहेत. परंतु मागील काही वर्षांमध्ये आझम खान विरोधात अनेक गुन्हे नोंद झाले असून याप्रकरणी ते दीर्घकाळापर्यंत तुरुंगातही राहिले आहेत









