यात्रेतील सहभागाबद्दल गूढ कायम
वृत्तसंस्था/ लखनौ
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून आयोजित होत असलेली भारत जोडो यात्रा 3 जानेवारी रोजी उत्तरप्रदेशात पुन्हा सुरू होणार आहे. या यात्रेचे निमंत्रण मिळाल्याची पुष्टी देत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राहुल गांधींचे याकरता आभार मानले आहेत. परंतु अखिलेश या यात्रेत सामील होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अखिलेश यांनी सोमवारी ट्विटरवर राहुल गांधी यांच्यासाठी एक पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात त्यांनी भारत जोडो यात्रेकरता राहुल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत भौगोलिक विस्तारापेक्षा अधिक एक भावना असुन यात प्रेम, अहिंसा, करुणा, सहकार्य आणि सौहार्द हे घटक भारताला जोडतात. ही यात्रा आमच्या देशायच याच सर्वसमावेशक संस्कृतीच्या संरक्षणाचे लक्ष्य प्राप्त करेल अशी आशा असल्याचे अखिलेश यांनी राहुल यांना उद्देशून नमूद केले आहे.
अखिलेश यादव हे या यात्रेत सामील होणार नसल्याचे राजकीय जाणकारांचे मानणे आहे. समाजवादी पक्ष सध्या काँग्रेसपासून अंतर राखण्याचे धोरण अवलंबून आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसचे संघटन अत्यंत कमकुवत आहे आणि 2017 मधील आघाडीच्या अनुभवामुळे अखिलेश हे काँग्रेसपासून अंतर राखत असल्याचे मानले जात आहे. तसेच राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील होत भाजपला स्वतःविरोधात नवा मुद्दा देण्याची त्यांची तयारी नाही. सप, बसप आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सारखेच असल्याचा दावा भाजपकडून केला जात असतो.









