काँग्रेसशी मध्यप्रदेशात जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव चांगलेच संतापले असून त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार प्रचार मोहीम हाती घेतली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे दोन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या युतीत सहभागी असतानाही त्यांच्यात मध्यप्रदेशात युती होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी ‘प्रथमग्रासे मक्षिकापात:’ अशी स्थिती झाली आहे. मध्यप्रदेशातील छतरपूर येथील चांदला मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार पुष्पेंद्र अहिरवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी यादव यांनी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेसने समाजवादी पक्षाला धोका दिला आहे. एक बाब चांगली झाली की, काँग्रेसने अगदी सुरवातीलाच धोका दिला. आता त्या पक्षाशी कसे वागायचे, हे आम्ही ठरवू. 2018 मध्ये मध्यप्रदेशात काँग्रेसचे सरकार समाजवादी पक्षाच्या साहाय्याने बनले होते. त्यानंतर काँग्रेसचेच उमेदवार फुटल्याने ते सरकार पडले. पण समाजवादी पक्षाचे आमदार सरकारशी एकनिष्ठ होते. आता आमचेच पूर्वीचे नेते राजेश शुक्ला हे भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. तर काँग्रेसने या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार आणून लादला आहे. राज्यात समाजवादी पक्षाचा प्रभाव वाढू नये असा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. ज्यांना साहाय्य केले त्यांनीच असा विश्वासघात केला आहे, असा आरोप यादव यांनी यावेळी केला. छतरपूर जिल्ह्यातील महाराजपूर या मतदारसंघातही समाजवादी पक्षाने उमेदवार दिला आहे. त्याचे नाव अजय दौलत तिवारी असे असून आज रविवारी यादव त्यांच्यासाठीही जाहीर सभा घेणार आहेत. एकंदर, अखिलेश यादव यांनी मध्यप्रदेशातील ही निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याचे दिसून येत असून त्यामुळे प्रचारातील चुरस आणखी वाढल्याचे दिसून आल्याचे जाणकारांचे मत आहे.









