मध्यप्रदेश निवडणुकीचा मुद्दा : ‘इंडिया’ आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर
► वृत्तसंस्था/ भोपाळ
उत्तरप्रदेशच्या 2017 मधील विधानसभा निवडणुकीत ‘युपी के दो लडके’ हा नारा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. हे दो लडके होते अखिलेश यादव आणि राहुल गांधी. परंतु आता मध्यप्रदेश निवडणुकीत जागावाटपावरून याच दोन्ही ‘लडकें’च्या पक्षांमध्ये राजकीय संघर्ष पेटला अहे. काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षासाठी राज्यात कुठलीच जागा सोडलेली नाही. यामुळे काँग्रेसवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यासोबत जागावाटपावरून चर्चा झाल्यावरही काँग्रेसने सपला एकही जागा सोडलेली नाही. यामुळे अखिलेश यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन न देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने मध्यप्रदेशात सपला जी वागणूक दिली तिची वागणूक उत्तरप्रदेशात काँग्रेसला देण्यात येणार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.
काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत सपला 6 जागा सोडण्याचा निर्णय झाला होता. परंतु काँग्रेसने राज्यातील सर्व जागांवर स्वत:चे उमेदवार घोषित केले आहेत. मागील निवडणुकीत सपचे 6 आमदार निवडून आले होते.
मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्या वक्तव्यावरुन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे भडकले आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करणार नसल्याचे माहित असते तर त्यांचा फोन आम्ही कधीच उचलला नसता असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले आहे.
मध्यप्रदेश निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे स्वत:चे गृहक्षेत्र छिंदवाडा येथे प्रचारदौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला होता. राज्यातील वातावरण पक्षासाठी अनुकूल आहे. उमेदवारी वाटप झाल्यावरही फोन कॉल येत असून लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. आम्ही अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने विजयी होऊ असे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी अखिलेश यादव यांच्याकडून काँग्रेसवर करण्यात आलेल्या ‘विश्वासघाता’च्या आरोपांबद्दल विचारणा झाली असता कमलनाथ यांनी ‘अखिलेश अखिलेश हा जप सोडून द्या’ असे उत्तर दिले.
कमलनाथ यांच्या याच वक्तव्यावरून अखिलेश यादव हे काँग्रेसवर भडकले आहेत. अखेर काँग्रेसला अन्य पक्षांना सोबत घेण्यात काय समस्या आहे हेच मला समजत नाही. कुठल्याही पक्षात शक्ती असल्यास त्याला सोबत घेतले जावे. राज्यात काँग्रेसला स्वत:चे सरकार स्थापन करायचे होते, तेव्हा मध्यप्रदेशात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे नेत आमच्या आमदारांना शोधत होते अशी टीका अखिलेश यांनी केली आहे.
‘इंडिया’च्या भरवशावर मी स्वत:च्या नेत्यांना निराश करू शकत नाही. सम आता भाजपला पराभूत करण्यासाठी तयार आहे. निर्णय काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. विधानसभा पातळीवर आघाडी होणार नसल्याचे आम्हाला माहित असते तर आम्ही बैठकीला गेलोच नसतो, तसेच काँग्रेस नेत्यांचे फोनही घेतले नसते असे अखिलेश यांनी म्हटले आहे.
इंडियाला कुठलेच भविष्य नाही
अखिलेश यादव आणि इंडियावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी उपरोधिक टीका केली आहे. दिल्लीत दोस्ती आणि राज्यात कुस्ती अशा स्वरुपात ही आघाडी निर्माण करण्यात आली होती. काँग्रेसने एक वर्षापर्यंत समाजवादी पक्षाला अंधारात ठेवल्याचे अखिलेश यादव यांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस, सप आणि आम आदमी पक्ष हे परस्परांशी लढत आहेत. मग त्यांच्यात आघाडी कशी होणार? काँग्रेसने मध्यप्रदेशातील स्वत:च्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून आता पक्षात कलह सुरू झाला आहे. इंडिया या आघाडीचे कुठलेच भवितव्य नाही असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.









