वृत्तसंस्था / लखनौ
विरोधी पक्षांच्या आघाडीतील पंतप्रधानपदाच्या इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. नितीश कुमार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि शरद पवार आदी नेत्यांच्या रांगेत आता उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचाही समावेश होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात ‘भविष्यातील पंतप्रधान अखिलेश यादव’ असा आशय असणारी भित्तीपत्रके लावण्यात आल्याने ही चर्चा सुरु झाली आहे.
त्याचप्रमाणे, विरोधी पक्षांच्या आघाडीत आता पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरुन बिघाडी निर्माण होऊ लागली आहे काय? असाही प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी अखिलेश यादव यांचे नाव कधीही पंतप्रधानपदाच्या इच्छुकांमध्ये नव्हते. पण, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सपला हव्या आहेत तितक्या जागा देण्यास काँग्रेसने नकार दिला असून विरोधी पक्षांची आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी आहे, विधानसभा निवडणुकांसाठी नाही, असे यादव यांना सुनावण्यात आल्याचाही आरोप होत आहे. त्यानंतर यादव यांनी काँग्रेसवर जाहीररित्या जोरदार टीका करताना, उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्यावेळी जागा वाटपात काँग्रेसला याची किंमत भोगावी लागेल, असा इशाराही दिला.
नव्या वादाला सुरवात

तेव्हापासून अखिलेश यादव यांचे नाव त्यांच्या पक्षाकडून पंतप्रधानपदाच्या इच्छुकांमध्ये घेतले जाऊ लागले आहे. या पक्षाचे एक कार्यकर्ते फख्रुल हसन यांनी पक्षाच्या मुख्यालयात यादव यांचे पोस्टर लावल्याने आणि ते भविष्यातील पंतप्रधान असल्याचा उल्लेख पोस्टरमध्ये केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजपकडून टीका
विरोधी पक्षांच्या आघाडीत पंतप्रधानपदासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या वाढत्या संख्येची भाजपकडून खिल्ली उडविली जात आहे. आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपला नेता पंतप्रधान होणार असे स्वप्न पडू लागले आहे. प्रत्येक पक्षाला अशी दिवास्वप्ने पाहण्याचा अधिकारच आहे, अशी खोचक टिप्पणी उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि भाजपचे नेते दानिश आझाद अन्सारी यांनी केली आहे.
माघार घेण्याचे आवाहन
समाजवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी मध्यप्रदेशातील आपले सर्व उमेदवार मागे घ्यावेत, अशी मागणी उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते अजय राय यांनी केल्याने वाद पुन्हा वाढला आहे. अखिलेश यादव यांच्या पक्षाला मध्यप्रदेशात कोणताही पाया नाही. त्यामुळे त्यांनी उमेदवार उभे करण्याचा अट्टाहास करु नये. त्यांच्या पदरात काही पडणार नाही, अशीही सूचना राय यांनी केली आहे.









