मायावतींनी सप प्रमुखाला विचारला प्रश्न
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशच्या मिल्कीपूर पोटनिवडणुकीच्या निकालावरून बसप सर्वेसर्वा मायावती यांनी समाजवादी पक्षावर शाब्दिक वार केला आहे. या मतदारसंघात बसपचा कुठलाही उमेदवार उभा नसतानाही सपचा इतका लाजिरवाणा पराभव कसा झाला? मागील पोटनिवडणुकांमध्ये सपने स्वत:च्या पराभवाचे खापर बसपवर फोडण्याचा राजकीय प्रयत्न केला होता, यामुळे यावेळी सपच्या उत्तराची लोकांना प्रतीक्षा असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
बसप सर्वसाधारणपणे पोटनिवडणुकीपासून दूर राहतो आणि स्वत:चे उमेदवार उभा करत नाही. उत्तरप्रदेशच्या मिल्कीपूर मतदारसंघात सप स्वत:च्या जागेवर 61,710 मतांनी पराभूत झाला आहे. बसपने निवडणूकविषयक आवश्यक सुधारणा होईपर्यंत देशात कुठलीही पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने या मतदारसंघात बसपचा उमेदवार नव्हता असे मायावती यांनी म्हटले आहे.
तरीही सपचा इतका लाजिरवाणा पराभव कसा झाला? सपने मिल्कीपूर पोटनिवडणुकीतील स्वत:च्या नामुष्कीजनक पराभवासाठी जनतेला उत्तर द्यावे, कारण मागील वेळी सपने स्वत:च्या पराभवासाठी बसपला जबाबदार ठरविण्याचा बालिश प्रयत्न केला होता. मिल्कीपूरच्या पराभवामुळे समाजवादी पक्षाला वस्तुस्थिती कळली असावी अशी टीका मायावती यांनी केली आहे.
दिल्लीत जिंकलेल्या भाजपला आता दोन कोटी जनतेला देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व पूर्ण करावे लागणार आहे. भाजप सरकारने सर्वप्रथम यमुना नदीची सफाई आणि वायू प्रदूषण इत्यादीपासून मुक्त करत दिल्लीला वास्तव्ययोग्य करावे असे मायावती म्हणाल्या.









