प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील मराठीप्रेमींनी केलेली विनंती, निवेदने व आवाहने यास न जुमानता मराठीद्वेष्टय़ा कोकणी लेखकाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणाऱया अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी व्यक्त केली.
आमोणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आजपासून महाराष्ट्रातील उदगीर येथे सुरू झाले. अ. भा. मराठी साहित्य संमेलन हे भारतभरातील मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे या संमेलनास मराठीच्या विरोधकांना बोलावले जाऊ नये, अशी भूमिका आम्ही घेतली. त्यासाठी संमेलन आयोजकांशी लेखी व तोंडी संपर्क साधून त्यांना गोव्यातील मराठी भाषिकांवर 1987 सालापासून होत असलेल्या अन्यायाबद्दल कल्पना दिली. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देखील आम्ही विविध माध्यमातून आमची कैफियत कळवली होती. राष्ट्रपतींना याआधी गोव्यातील मराठी भाषिकांचे शिष्टमंडळ भेटलेले आहे. गोमंतकीय मराठी भाषिकांची वेदना त्यांनी जाणली म्हणून देखील अशा असंवेदनशील लोकांच्या साहित्य संमेलनाला येणे त्यांनी टाळले असावे, असे आम्हाला वाटते आणि त्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आम्ही गोमंतकीयांच्या वतीने अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
महामंडळ पदाधिकाऱयांचा निषेध
अखिल भारतीय साहित्य महामंडळाला महाराष्ट्राबाहेरील मराठीचे जतन आणि संवर्धन करण्याची औकात नसेल तर त्यांनी गप्प बसावे. पण ज्या राज्यात मराठीवर अन्याय होत आहे तेथील मराठीच्या शत्रूंना तुम्ही सन्मान देण्याचे पाप करू नका, अशी विनंती आम्ही केली होती. तरीही महामंडळ पदाधिकारी आणि संमेलन आयोजकांना आमची वेदना कळली नाही. या असंवेदनशीलतेचाही आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, असे आमोणकर म्हणाले.








