चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर
प्रतिनिधी/कोल्हापूर
Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal election announced : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा निवडणूकीसाठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. प्रशांत पाटील यांची नियुक्तु केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून वादात असलेल्या चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी चित्रपट महामंडळाचे मतदान होईल तर 22 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. हे मतदान 17 जागांसाठी होणार असून 44 हजार नोंदीत मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी ऍड. प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऍड. पाटील म्हणाले, चित्रपट महामंडळातील सदस्यांच्या मागणीनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 14 सप्टेंबरला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निवडणूकीची अधिसूच्ना जाहीर केली. 27 सप्टेंबरला सभासदांची कच्ची मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. 12 आक्टोबरला सभासदांची पक्की मतदार यादी प्रसिध्द होईल. 13 ते 15 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज वाटप केले जातील. 17 ते 19 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज स्विकारले जातील. 20 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची यादी प्रसिध्द केली जाईल. 27 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. 29 ऑक्टोबर रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार. 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत. 4 नोव्हेंबर रोजी निवडणुकीस पात्र उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी प्रसिध्द होईल. 18 ते 19 नोव्हेंबर मतदान साहित्य विविध मतदान केंद्रावर पाठवले जाईल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार. तर 22 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल.
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष भोसले म्हणाले, विरोधकांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप खोटे आहेत. यापुर्वीच चित्रपट महामंडळाचे ऑडीट कार्यवाह यांच्या सहीने झाले आहे. चालु वर्षाचे ऑडीत नवीन कार्यकारिणी येईपर्यंत पूर्व होईल. विरोधकांच्या आरोपाला मी केराची टोपली दाखवली आहे. येत्या निवडणूकीत चित्रपट महामंडळाचे सभासदच त्यांना त्यांची पात्रता दाखवतील. मी 17 उमेदवार उभा करून ते निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. तसेच ज्यांना पाहायचे ते पाहू शकतात किंवा ज्यांना स्वतःच्या पैशाने रिऑडीट करून घ्यायचे ते करून घेवू शकतात. त्याचबरोबर जयप्रभा स्टुडीओसंदर्भात जे आंदोलन सुरू आहे, त्यासंदर्भात आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. तरीपण जयप्रभा स्टुडीओ वाचला पाहिजे हीच आमची भूमिका असणार आहे. यावेळी आकाराम पाटील, खजीनदार संजय ठुबे आदी उपस्थित होते.