बसपास शुल्क रद्द करावे, विविध मार्गांवर बसफेऱ्या वाढविण्याची मागणी
बेळगाव : जुन्या बसपासची मुदत वाढविण्यासाठी घेण्यात येणारे शुल्क रद्द करावे आणि विविध मार्गांवर बसफेऱ्या वाढवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलन छेडण्यात आले. याबाबत परिवहनचे डिटीओ के. के. लमाणी यांना निवेदन सादर करण्यात आले. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जुन्या बसपासची मुदत संपली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी 200 रुपये शुल्क देऊन मुदत वाढवून घेतली होती. तीही मुदत आता संपली आहे. त्यामुळे पुन्हा मुदत वाढवून देण्यासाठी परिवहनकडून शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या बसपासची मुदत कोणतेही शुल्क न घेता वाढवून द्यावेत, अशी मागणीही पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचा खासगी वाहनाने प्रवास
शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत बसप्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना बस मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे बसपास असूनदेखील विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तर काहीवेळा दरवाजात लोंबकळतच जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विविध मार्गांवरून बसफेऱ्या वाढवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणीदेखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी परिवहनकडे केली आहे. यावेळी विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि यामध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले. यावेळी शिवानंद बिज्जरगी, रोहित आलकुंटे, संदीप वनगले, प्रशांत शल्लीकेरी, विश्वनाथ विजापुर यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.









