संत सावता महाराज प्रतिमेची भव्य मिरवणूक
दक्षिण सोलापूर: आलेगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज व विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तिची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहणाचा दिव्य सोहळा पार पडला. यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन संत सावता महाराज प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. शनिवार (दि. २४) जुलै रोजी संत सावता महाराज प्रतिमेची भव्य मिरवणूक आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने पार पडली.
अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, सप्ताहात काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, किर्तन, हरिजागर यासह अन्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
कीर्तनकार ह.भ. प. किरणताई सारंग सुरवसे, ह. भ. प. बन्सीलाल भोसले महाराज, ह. भ. प. संजय पाटील महाराज, ह. भ. प. आबा महाराज, ह. भ. प. महांतेश घंटे महाराज, ह. भ. प. माऊली महाराज, ह. भ. प. वैभव महाराज आदींनी किर्तनातून पंचक्रोशीतील भक्तांना मार्गदर्शन केले.
सात दिवस चाललेल्या या सप्ताहाची सांगता गुरुवारी करण्यात आली. सकाळी ८ ते १२ यावेळेत संत सावता महाराज मंदिरपासून गावातून मोठया भक्तिभावाने आणि टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत असंख्य महिला, मुली डोक्यावर तुळशी कलश, ग्रंथ दिंडी घेऊन सहभागी होत्या. बाल वारकरी समूहाने नेत्रदीपक टाळ कला सादर केली. हरीनामाचे स्मरण करत मिरवणूक काढली व मंदिरा समोरील मंडपात महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत शिरोमणी सावता महाराज पंच कमिटी व समस्त आलेगाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.








