एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी स्वत:च्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अकबरुद्दीन हे स्वत:च्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. एआयएमआयएम नेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात ते पोलिसांना धमकावित असल्याचे दिसून येते.
अकबरुद्दीन ओवैसी हे हैदराबाद येथील एका सभेला संबोधित करत होते. याचदरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांचा दाखला देत प्रचारसभा संपविण्याची सूचना केली. परंतु ही गोष्ट ओवैसी यांना रुचली नाही, त्यांनी व्यासपीठावरूनच पोलिसांना धमकाविण्यास सुरुवात केली. याचबरोबर ओवैसी यांनी पोलीस अधिकाऱ्याला व्यासपीठावरुन खाली उतरविले.
इन्स्पेक्टर साहेब, माझ्याकडे घड्याळ आहे. गोळी-चाकूची (स्वत:वरील हल्ला) गोष्ट ऐकून मी कमकुवत झाल्याचे वाटले असेल. परंतु माझ्यात अद्यात खूप हिंमत आहे, माझ्या वाटेत आडवे येऊ नका. मला रोखणारा अद्याप जन्माला आलेला नाही. मी एक इशारा केला तर तुमची पळताभुई थोडी होईल असे अकबरुद्दीन यांनी पोलीस अधिकाऱ्याला उद्देशून म्हटले आहे. हे पोलीस आमच्या प्रचाराला कमकुवत करण्यासाठी अशाचप्रकारे येत असतात. अकबरुद्दीन ओवैसीचा मुकाबला करणारा कुणीच नसल्याचे विरोधकांना माहिती आहे. याचमुळे पोलीसच विरोधी पक्षांचे हस्तक ठरले आहेत. तुम्ही रहाल का आम्ही हे एकदा पाहुयाच अशी धमकी अकबरुद्दीन यांनी दिली आहे.









