वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणा सरकारने एमआयएमचे आमदार अकबरु द्दीन ओवैसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. सहसा सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदाराला प्रोटेम स्पीकर बनवले जाते. त्यांचे काम नवीन आमदारांना शपथ देणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करणे असे असते. मात्र, तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह यांनी ‘जिवंत असेपर्यंत अकबऊद्दीन ओवैसी यांच्याकडून शपथ घेणार नाही’, असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘तुम्हालाही बीआरएसचा मार्ग अवलंबायचा आहे का?’ अशी विचारणा करत 2018 मध्ये बीआरएस सरकारने अकबऊद्दीन ओवैसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली होती, तेव्हाही आम्ही शपथ घेतली नव्हती, याची आठवण करून दिली आहे.
रेवंत रेड्डी यांचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मलकानगिरी लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला. रेड्डी यांनी शुक्रवारी संध्याकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन राजीनामा दिला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे निमंत्रक आणि खासदार माणिकम टागोरही उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेड्डी यांनी तेलंगणातील कोडंगल विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर ते आता मुख्यमंत्री बनले आहेत.









