वृत्तसंस्था/ चंदीगढ
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिपिंकसाठी आपली पात्रता यापूर्वीच सिद्ध करणारा पंजाबचा धावपटू आकाशदीप सिंगने मंगळवारी येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या पुरूषांच्या 20 कि. मी. चालण्याच्या शर्यतीत विजेतेपद कायम राखताना नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
आकाशदीप सिंगने या शर्यतीमध्ये एक तास, 19 मिनिटे आणि 38 सेकंदाचा अवधी घेत यापूर्वी रांचीत 2023 च्या राष्ट्रीय खुल्या 20 कि. मी. चालण्याच्या शर्यतीमधील आपलाच नोंदविलेला एक तास, 19 मिनिटे आणि 55 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. या शर्यतीमध्ये उत्तराखंडच्या सुरज पनवारने दुसरे स्थान मिळविताना एक तास, 19 मिनिटे 43 सेकंदाचा अवधी घेतला. पॅरीस ऑलिपिंक पात्रतेसाठी एक तास, 20 मिनिटे आणि 10 सेकंदाची अट घालण्यात आली होती. आता पॅरीस ऑलिपिंक स्पर्धेत भारताचे चार स्पर्धक या क्रीडाप्रकारात सहभागी होणार आहेत. प्रेमजित बिस्त आणि विकास सिंग यांनीही गेल्यावर्षी जपानमध्ये झालेल्या आशियाई चालण्याच्या शर्यतीमध्ये पॅरीस ऑलिपिंकचे तिकीट निश्चित केले होते. दरम्यान पॅरीस ऑलिपिंक स्पर्धेसाठी कांही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही देशाला वैयक्तिक ट्रॅक-फिल्ड प्रकारामध्ये केवळ तीन स्पर्धकांना पाठविण्याची मुभा देण्यात आल्याने आता भारताच्या या चार धावपटूंपैकी तिघांची पॅरीस ऑलिपिंकसाठी निवड करण्याची जबाबदारी अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनवर राहील.









