मुकेश अंबानी यांचा राजीनामा ः नूतन अध्यक्षांना संचालक मंडळाची मंजुरी
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जियो मंडळाचा राजीनामा दिला आहे. आता ही जबाबदारी त्यांचे पुत्र आकाश अंबानी यांच्याकडे देण्यात आली आहे.
रिलायन्स जियो इन्फोकॉमच्या 27 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदरचा वरील निर्णय घेतला गेला. आकाश अंबानी यांच्याकडे रिलायन्स जियोच्या चेअरमनाची धुरा सोपवण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 27 जून रोजी मुकेश अंबानी यांनी आकाश यांच्या नेमणुकीनंतर तातडीने राजीनामा दिला. आकाश हे रिलायन्स जियोमध्ये बिगर कार्यकारी संचालक म्हणून आधीपासून कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षात कंपनीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका ते बजावत आहेत. यांच्यासोबत पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचलकपदी तर रमींदर सिंग गुजराल आणि के व्ही चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
2021 मध्ये अंबानी यांनी आपली मुले आता अधिक जबाबदाऱया अंगावर घेत आहेत तसेच नेतृत्वही करण्यास सक्षम होत आहेत, असे म्हटले होते. आपल्या मुलांमध्येही नेतृत्वाची चमक दिसत असून हे पाहूनच आपण ही जबाबदारी आकाशकडे सोपवल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.
आकाश अंबानीविषयी..
आकाश हे ब्राऊन यूनिव्हर्सिटीतून इकॉनॉमी विषय घेऊन पदवीधर झाले आहेत. डिजिटल सेवेच्याबाबतीत आकाश यानी उत्तम योगदान दिले आहे. 4जीसह इतर सेवांच्या विकासावर ते बारीक लक्ष ठेवून आहेत. जियो फोननंतर कंपनीला प्रगतीपथावर कार्यरत होणे शक्य होत आहे.









