नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या 81 व्या राष्ट्रीय महिलांच्या स्क्वॅश स्पर्धेत गोव्याच्या आकांक्षा साळुंखेने विश्व स्क्वॅश स्पर्धेतील दुहेरी सुवर्णपदक विजेती जोश्ना चिन्नाप्पाला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्याच प्रमाणे अनाहत, अभय आणि व्हेलावेन यांनीही अंतिम फेरीत स्थान मिळविले. चेन्नईमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 2025 च्या विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेत गोव्याच्या आकांक्षा साळुंखेने भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले आहे. महिलांच्या उपांत्य सामन्यात गोव्याच्या आकांक्षाने 38 वर्षीय ज्योत्स्नाचा 11-5, 13-11,
7-11, 12-10 अशा चार गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 2024 साली भारताच्या ज्योत्स्ना चिनाप्पाचा पद्मश्री पुरस्कार देवून भारतीय शासनातर्फे गौरव करण्यात आला होता. आता गोव्याची 26 वर्षीय आकांक्षा आणि दिल्लीची अनहात यांच्यात अंतिम फेरीसाठी लढत होईल. दिल्लीच्या अनहातने दिल्लीच्या तन्वी खन्नाचा 3-11, 11-5, 11-0, 11-9 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या विभागात तामिळनाडूच्या अभय आणि व्हेलावेन यांनी उपांत्य फेरीचे आपले सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळविले. तामिळनाडूच्या अभयने बंगालच्या रमीत टंडनचा 11-13, 11-5, 11-6, 11-7 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता अभय आणि व्हेलावेन यांच्यात अंतिम लढत होईल.









