राष्ट्रपतिपदाची निवडणूक ः चंदीगडमध्ये कोअर कमिटीची बैठक
वृत्तसंस्था/ चंदीगड
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दलाने भाजप उमेदवाराला पाठिंब्याची घोषणा केली आहे. भाजपने आदिवासी समुदायाशी संबंधित द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. यासंबंधी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सुखबीर बादल यांच्याशी चर्चा केली होती. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायाच्या असल्याने आणि त्या महिला असल्याने त्यांना समर्थन देण्याची तयारी अकाली दलाने दर्शविली आहे.
अकाली दल आणि भाजप सुमारे 24 वर्षे पंजाबमध्ये आघाडीत राहिले. मागील वर्षी केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात अकाली दलाने भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणली होती. पंजाब निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची अपेक्षा होती.
भाजपची साथ सोडल्याने अकाली दलाला अधिक नुकसान झाले आहे. केंद्र सरकारमधील पक्षाचे प्रतिनिधित्व संपुष्टात आले. त्यानंतर पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाला केवळ 3 जागा जिंकता आल्या. तर भाजपही 2 जागांवर विजयी झाला. दोन्ही पक्षांची आघाडी असती तर हा आकडा वाढला असता. संगरूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत 5 व्या स्थानावर राहिल्याने अकाली दलासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.









