सुनील पाटील आजरा
‘गाव करील ते राव काय करील’ ही म्हण सार्थ ठरवित दाभिल ग्रामस्थांनी श्रमदानातून शाळेच्या जुन्या इमारतीचे रूपडे पालटविले. आजरा तालक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर साधारण 1800 च्या आसपास दाभिलची लोकसंख्या आहे. दुर्गम व डोंगराळ भागात असणाऱ्या या गावाने एक आदर्शवत काम करत एकजुटीचे दर्शन घडविले आहे. गावामध्ये असणाऱ्या जुन्या पडक्या दाभिल विद्यामंदिरच्या इमारतीचा श्रमदानातून कायापालट केला आहे.
गेली अनेक वर्षे गावामधील विद्यामंदिरची जुनी इमारत धूळ खात पडली होती. आजचा विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असल्याचे लक्ष्यात घेत गावचे लोकनियुक्त सरपंच युवराज पाटील यांच्या कल्पनेतून विद्यामंदिरची जुनी इमारत आपण श्रमदानातून उभारूया असा प्रस्ताव तरूण मंडळी तसेच गावकऱ्यांसमोर मांडला. सरपंच पाटील यांचे काम पाहता गावकऱ्यांनी त्यांना इमारत उभारण्यासाठी साथ देण्याचे ठरविले. सोशल मीडिया तसेच नागरीकांना आवाहन करत शाळेसाठी मदत देण्याचे आवाहन करण्यात आले. बघता बघता दोन महिन्यात मुंबईकर ग्रामस्थांसह गावकऱ्यांनी शाळेसाठी 2 लाखांची मदत जमा केली. जवळजवळ दोन महिने ग्रामस्थांच्या श्रमदानातून जुनी शाळा इमारत दुरूस्त करून उभा केली. शाळेचा वरचा थाट असो किंवा छताच्या वरती घालण्यात येणारी कौले यासारख्या अनेक गोष्टी आपले काम बाजूला ठेवून श्रमदानातून केल्या.
दररोज गावातील तरूण मंडळींसह ज्येष्ठ तसेच आबालवृद्धांसह सर्वजण आपल्या परीने योगदान देत होते. गावातील सध्याची शाळा इमारत ही गावापासून दूर आहे. विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळा ही जंगल परिसरात असल्याने जंगली जनावरांची भिती आहे. याचेच गांभिर्य लक्षात घेत सरपंच पाटील व ग्रामस्थांनी गावातील शाळा दुरूस्त करून मुलांचा त्रास वाचविण्यासाठी गावातच शाळा भरवायची असा निर्धार केला. यासाठी गेले तीन महिने गावातील ग्रामस्थांनी श्रमदान करून धुळ खात पडलेली विद्यामंदिरची इमारत श्रमदानातून दुरूस्त करून शिक्षणाविषयी असणारी तळमळ दाखवून दिली.
सध्या सुविधांचा अभाव असल्याचे कारण देत अनेक पालक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिक्षणासाठी पाठवत आहेत. गावची शाळा हे संस्कार केंद्र असते, गावचे हे संस्कार केंद्र कायम सुरू रहावे याकरीता गावातून प्रयत्न होत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. पण दाभिल गाव याला अपवाद ठरले असून गावची शाळा सुरू राहण्याबरोबरच ती सुसज्ज व सुंदर असायला हवी. विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सोयीची असावी यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून जुन्या शाळा इमारतीचे रूपडे पालटण्यासाठी केलेले कार्य निश्चित कौतुकास्पद आहे.
ग्रामस्थांसोबत सरपंचांचेही श्रमदान
गावातील जुनी शाळा इमारत लोकसहभागातून दुरूस्त करून गावाबाहेर भरणारी शाळा गावात भरविण्याची संकल्पना सरपंच युवराज पाटील यांनी ग्रामस्थांसमोर मांडली. सरपंचांच्या संकल्पनेला पाठिंबा देत ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांनी सढळहाताने मदत केली. श्रमदान केले आणि जुनी शाळा इमारत सुसज्ज बनविली. ग्रामस्थ श्रमदान करीत असताना सरपंच पाटील यांनी देखील पदाचा टेंभा न मिरविता स्वत: श्रमदान करून आपण कोणी वेगळे नाही, सरपंच असलो तरी ग्रामस्थांपैकीच एक आहोत हा संदेश सर्वांना देण्याचा प्रयत्न केला.









