Shivaji University Exam : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर आले आहे. याचबरोबर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. याचपार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाकडून आज (20 जुलै) होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.याबाबात आजच्या परीक्षांची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली. याचे परिपत्रक शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्रातील 580 परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे, तर 7 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्रातील परीक्षा या 25 मे ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहेत. एकूण 676 अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. त्यातील 580 अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 40 परीक्षा सुरु असून 49 परीक्षा नियोजित आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळेत सुरु झाल्या असून, आतापर्यंत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. 519 अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. हे सर्व निकाल 1 ते 22 दिवसात जाहीर केले आहेत.