स्वागता दरम्यान विट्याचा डंका : केदारवाडीत जल्लोषी स्वागत : वैभव पाटील यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही
इस्लामपूर युवराज निकम
अजितदादा यांचा कोल्हापूर दौरा सांगली जिल्हा आणि वाळवा तालुक्याच्या जिह्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरला. कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कासेगाव जन्मभूमीतून आणि त्यांचा बालेकिल्ला इस्लामपूर आणि शिराळ्याच्या हद्दीवरून जाणार होते. त्यामुळे भाजपाने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. पण खऱ्या अर्थाने वाळव्याच्या या भूमीत लक्ष वेधून घेतले ते विट्याच्या वैभव पाटील यांनी.
त्यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू यांच्या पुतळ्यास अभिवादन कऊन समर्थकांसह केदारवाडी फाट्यावर शक्तिप्रदर्शन करीत स्वागत केले. यावेळी अजितदादा यांनी खानापूरच्या प्रश्नासाठी वैभव यांच्या पाठीशी पूर्ण ताकद देवू, अशी ग्वाही दिली. अजितदादा यांच्या कोल्हापूर दौऱ्याची चर्चा जोरात झाली. खेड शिवापूरपासून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. पण वाळवा तालुक्यातील स्वागताकडे सांगली जिल्हा किंबहुना राज्याचे लक्ष लागून राहिले. कारण हा मतदार संघ जयंत पाटील यांचा आहे. आणि आशियायी महामार्ग हा इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीवऊन जात आहे. जयंतराव आणि शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी फुटीनंतर खा. शरद पवार यांच्या सोबत ठाम राहिले आहेत.
भाजपाचे नेते अजितदादांचे जंगी स्वागत करणार हे निश्चित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दादांचे कासेगाव येथे स्वागत केले. पेठ नाका येथे राहुल व सम्राट महाडिक यांनी कमानी लावून स्वागत करतानाच, आपल्या व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलात त्यांच्यासाठी भोजन ठेवले होते. भाजपा कर्तव्य भावनेने ग्राऊंडवर उतरले. पण अजितदादांच्या साथ-संगतीला जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण-कोण खुलेआम येणार, याकडे लक्ष होते.
वाळवा व शिराळा तालुक्यातील खास राष्ट्रवादीचे कुणी महत्वाचे पदाधिकारी त्यांच्या स्वागताला आले नाहीत. पण विट्याचे वैभव पाटील हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. ते मुंबई येथे दादांच्या बैठकीत दिसून आले. ते अजितदादा यांच्यासोबत जाणार असल्याची आवई उठली आहे. कोल्हापूर दौऱ्या दरम्यान पाटील हे अधिकच खुले झाले. त्यांनी महामार्गावर कासेगाव ते पेठनाका दरम्यान आपल्या फोटोसह फलक लावले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता ताणली होती.
पाटील हे अजितदादांच्या स्वागतासाठी आले, ते ताकारी मार्गे. त्यांनी येताना वाहनांच्या लवाजम्यासह समर्थक मोठया संख्येने आणले होते. त्यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर बापूंच्या पुतळ्यास अभिवादन कऊन पेठ नाक्याकडे समर्थकांच्या वाहनांच्या ताफ्यासह आगेकूच केली. पण त्यांनी दादांच्या स्वागताचे ठिकाण निवडले, ते केदारवाडी फाटा. त्यांनी जल्लोषात तिथं स्वागत केले. दादा यांनी तिथं मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी वैभव पाटील यांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावू. आपल्याला नवी टीम तयार करायची असल्याचे सूचक वक्तव्य केले.
चर्चा झाली लवकरच निर्णय
यावेळी अजित पवार म्हणाले, सदाभाऊ पाटील व वैभव पाटील यांचे पूर्वीपासून संबंध सलोख्याचे आहेत. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. शेतकरी, युवक व त्या भागातील पाणी योजनांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेवून जात आहे. शाहु, फुले, आंबेडकरांचा विचार आत्मसात करुन पुढे चालत आहोत. खानापूर भागातील प्रश्न माहीत आहेत. त्यामुळे आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. यापुढे वैभव पाटील यांना कधीही अंतर देणार नाही, त्यांच्या पाठीशी ठाम राहू. दरम्यान माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, दादांनी घेतलेल्या स्वाभिमानी निर्णयाच्या मागे उभा राहू. जिल्ह्यात पक्षवाढीसाठी दादा टाकतील, ती जबाबदारी स्वीकारु. त्यांच्यामागे खंबीर राहू, लवकरच दादांना खानापुरात बोलावून मेळावा घेवू, दादांची व भूमिका स्पष्ट करु.
दादांना आमदार करायचयं
केदारवाडी येथे स्वागता दरम्यान वैभव पाटील समर्थकांनी स्टेज उभारुन ‘ठोस दिशा, ठाम निर्णय’ असे पाटील यांच्या फोटोसह डिजिटल लावले होते. यावेळी अजित पवार बोलत असताना वैभव पाटील यांच्या समर्थकांत उत्साह होता. त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान वैभव दादांना ‘आमदार करायंचं हाय’, असा नारा दिला. त्यामुळे वैभव पाटील यांचे व त्यांच्या समर्थकांचे अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचे जवळ जवळ निश्चित झाल्याचे स्पष्ट होत आहे.








