ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा राज्यातील जनतेला व्हावा, यासाठी त्यांनी आमच्यासोबत सरकारमध्ये यावं, अशी खुली ऑफर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, अशी मिश्कील टिप्पणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
सुळे म्हणाल्या, चित्रपट दिग्दर्शकांना अमिताभ बच्चन हे आपल्या चित्रपटात हवे असतात. कारण त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालती. तसंच राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनाही घ्यावसं वाटतं. कारण अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. यात वाईट काय, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जाहिरातवादावर त्या म्हणाल्या, राज्यातील सत्ताधारी पक्ष जाहीरातींवर पैसा खर्च करण्यात व्यस्त आहे. शिवसेनेचा जाहिरात वाद दुर्दैवी आहे. सत्ताधारी पक्ष आपापसात वाद घालत आहे. वृत्तपत्रांमध्ये अशी जाहिरात देण्यासाठी कोटय़वधी रुपये लागतात. आम्हीही अशी जाहिरात देणाऱ्या हितचिंतकांच्या शोधात आहोत.