ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असे विधान केले होते. या वक्तव्याविरोधात भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी आज अजित पवारांच्या बारामतीमधील सहयोग निवासस्थानासमोर “अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार..” अशी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
अजित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बारामतीमधील भाजप कार्यकर्ते भिगवन चौकात आंदोलन करणार होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देत अचानक कार्यकर्ते अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर एकत्र आले आणि जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या पुतळय़ाचे त्यांनी दहन केले. यावेळी “अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार..” अशा घोषणा देण्यात आल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अधिक वाचा : नोटाबंदीचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा








