प्रतिनिधी/ मुंबई
राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जाहीर केली. या फेरबदलामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गट वरचढ ठरला आहे. या सुधारीत यादीनुसार अजित पवार यांच्याकडे पुणे जिह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पुणे जिह्याचे पूर्वीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिह्याचे पालकत्व देण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजित पवार गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे.
राष्ट्रवादी फुटली नाही, असे शरद पवार गटाकडून सांगण्यात येत असले तरी दोन गट निश्चित आहेत. त्यापैकी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. राष्ट्रवादीचे गटातटाचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे असताना आपलाच गट खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा प्रबळ करण्यासाठी आणि बारामती मतदारसंघ असलेल्या पुण्यात वर्चस्व वाढविण्यासाठी अजित पवारांना पालकमंत्रीपद महत्त्वाचे होते. ते त्यांना मिळाले. ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचे पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र, तरीही पालकमंत्री ठरत नव्हते. शिंदे सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपने स्वत:कडे ठेवले होते. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती. मात्र अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते.
अजित पवार गटाला 7 पालकमंत्रीपदे
पुण्यात राष्ट्रवादीचे बळ आहे. पुणे महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे महापालिका राखली जावी म्हणून अजित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाला चांगले यश यावे म्हणून अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद आपल्याला देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. या नव्या निर्णयानुसार आता अजित पवार गटाकडील पालकमंत्रीपदांची संख्या सातवर पोहोचली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद काढून घेत ते अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्याने चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद जाईल असे वाटत होते. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी जाईल अशी चर्चा होती. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.
रायगड पालकमंत्रीपदाबाबत निर्णय नाही
राज्यातील 12 जिह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर असली, तरी पालकमंत्रीपदावरून अधिक संघर्ष असलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय या यादीत घेण्यात आलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त भार सध्या शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याकडेच आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून संधीचे राजकारण
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपला जास्त जागा असून सुद्धा शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करत मुख्यमंत्रीपद स्वत:कडे घेतले आणि भाजपला वंचित ठेवले. त्याची भरपाई भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन केली. फडणवीस यांनी एकप्रकारे संधी साधत राजकारण केले. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी दावा करणार नाही, असे सांगत राष्ट्रपती राजवटीची आयडिया शरद पवार यांनी दिली. मात्र ऐनवेळी त्यांनी घूमजाव करत शिवसेनेला जवळ करत सत्तास्थापन केली आणि फसवणूक केली, असा फडणवीस यांचा दावा आहे. मात्र संधी मिळताच त्यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. आत्ता तर त्यांनी अजित पवार यांना हवे असलेले पुण्याचे पालकमंत्रीपदही दिले आहे. यात चंद्रकांत पाटील यांना डच्चू नाही, अजित पवार यांची सरशी नाही, तर हे संधीचे केलेले राजकारण असल्याचे बोलले जात आहे.









