ऑनलाईन टीम / मुंबई :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील. हे सगळं स्क्रिप्टेड आहे, असे खा. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री अजित पवार असे बॅनर लागले आहेत. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होणार हे मी आगोदरच सांगितलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील. हे सगळं ठरलेलं आहे.
दरम्यान, बंड करण्यापूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंसह काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपद दिली गेली. त्यानंतर वर्षभर मंत्रिमंडळ विस्तार रखडला. त्यानंतर अजित पवार गट सरकारमध्ये सामिल झाला आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना मंत्रिपद मिळालं. त्यामुळे शिंदे गटातील अनेक मंत्री नाराज आहेत, असेही राऊत म्हणाले.








