पुणे / प्रतिनिधी :
खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अवघे तीन दिवस झाले आहेत. लगेच पोटनिवडणुकीची चर्चा कशाला करायची. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. लगेच पोटनिवडणुकीसंदर्भात विधानं केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असे लोकं म्हणतील. त्यामुळे लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही, अशा शब्दात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेसच्या विजय वड्डेटीवार यांच्यावर संताप व्यक्त केला.
अजित पवार पुण्यात बोलत होते. ते म्हणाले, संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. माझे संभाजीनगरमधील नागरिकांना सांगणे आहे, की कोणी जर तुमची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला थारा देऊ नका. तसेच महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणावी. याबरोबरच सभेदरम्यान संभाजीनगरमधील वातावरण बिघडेल, असे कोणतेही विधान कोणीही करू नये.
…अन् बापट यांना मंत्रिपदाची संधी मिळाली
बापट यांना 2014 मध्येच खासदार बनायचे होते. त्यांनी मला सांगितले की, अजित आता आमदारकी बस झाली. मला खासदार व्हायचं आहे. परंतु, तेव्हा भाजपने अनिल शिरोळे यांना तिकीट दिले. त्यामुळे बापटांना आमदार व्हावे लागले. त्यानंतर सुदैवाने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि बापट यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, अशी आठवण पवार यांनी यावेळी सांगितली.








