ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते कार्यक्षम नेते असून, त्यांच्या कामाचा फायदा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये अजितदादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील, याची मला खात्री आहे. अजितदादांनी ही आमच्या सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, असे म्हणत शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना खुली ऑफर दिली.
दीपक केसरकर यांनी आज शिर्डीत मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवारांना सरकारमधील कामाचा चांगला अनुभव आहे. त्यांची सध्या पक्षात घुसमट सुरू आहे. त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांच्या अनुभवाचा राज्यातील जनतेला उपयोग होईल.
यावेळी केसरकर यांनी नुकत्याच उफाळून आलेल्या दंगलीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, दंगली करणारे सत्तेवर बसले तर दंगली होणारच नाहीत. त्यांनी दंगली केल्या असे मी म्हणत नाही. कोल्हापुरात जी दंगल घडली त्यात एकही माणूस शहरातील नव्हता. बाहेरून आलेले लोक होते. दंगल होणार याची माहिती नेत्यांना अगोदर कशी काय मिळते? सामाजिक ऐक्य राखणे सर्वांचेच कर्तव्य आहे. तुम्ही दंगली भडकवणार आणि आमच्यावर आरोप करणार हे आता चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.








