गणपती पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री याबाबत निर्णय होऊन राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना राज्यातील विविध जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळेल असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रदेशाध्यक्ष गटाचे सुनिल तटकरे यांनी केले आहे. तसेच शरद पवार यांचा फोटो न लावण्याचा निर्णय त्यांच्या आदेशावरूनच घेतला असल्याचाही खुलासा त्यांनी आज कोल्हापूरात केला. कोल्हापूरात शरद पवार गटाची सभा झाल्यावर अजित पवार गटाकडूनही उत्तरदायित्व सभा महाराष्ट्रभर आयोजित केली जात आहे. अजित पवार गटाचे सर्व नेते झाडून कोल्हापूर दौऱ्यावर असून या दौऱ्याची जय्यत तयारी केल्याची दिसून येत आहे. या सभेसाठी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.
उत्तर दायित्व सभेपुर्वी माध्यमांशी बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, “शरद पवारांना आम्ही दैवत मानतो ती भावना आजही आमची आहे. आम्ही जो राजकीय निर्णय घेतला आहे तो कोल्हापूरातल्या जनतेपर्यंत पोहोचवायचा असून तसा प्रयत्न करत आहे. आम्ही महाधिवेशन घेतले तेंव्हाच सर्वच प्रादेशिक भागात जाऊन सभा घेण्याचे आम्ही ठरवले होते. ही आमची सभा शरद पवारांच्या सभेला उत्तर नाही तर उत्तरदायित्व सभा आहे. कोल्हापूरातील तपोवन मैदानामध्ये सभा घेण्याचे धाडस केवळ हसन मुश्रीफच दाखवू शकतात. तसेच गणपती पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री बाबत निर्णय होईल. तसेच आमच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यात संधी भेटेल.” असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही पिटीशन दाखल केली आहे त्यानुसारच सुनावणी होईल. आम्ही जी भूमिका घेतली त्यावर न्यायालय शिक्कामोर्तब करेल. शरद पवार यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांचा फोटो न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः माझा फोटो वापरु नका असे सांगितले त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांच्या भूमिकेवर मी आज काही बोलणार नाही. साहेबांनी त्यांची भूमिका मांडली त्यांच्याकडून आमच्यावर आशीर्वाद रहावा अशी काल मागणी केली. उद्याही आमची तीच अपेक्षा असणार आहे.” असा खुलासाही त्यांनी केला.
मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य़ करताना ते म्हणाले, “2004 साली आम्हाला संधी आली होती. तेंव्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला होता. दादा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची ईच्छा आहे. पण आम्हाला काही घाई नसून राज्यात आता एनडीएच्या माध्यमातूनच पुढे जाणार.” असा खुलासाही त्यांनी केला.
मराठा आरक्षण आंदोलनावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, “आमचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. आम्हाला आवश्यक तो कालावधी द्यावा आणि त्यांनी त्यांचे उपोषण स्थगित करावे. मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घाईघाईने निर्णय नको, तो कोर्टात सुद्धा टिकावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांडे यांच्या आंदोलनावर योग्य ती भूमिका घेत आहेत.” असेही ते म्हणाले.