शिंदे गटाने दिलेल्या राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे या जाहीरातीमुळे झालेल्या चर्चांना थांबवण्यासाठी आज एक नविन जाहीरात काढल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. कालच्या जाहीरातीवर होत असलेल्या टिकेमुळे आज विविध वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील ९ मंत्र्यांचे फोटो छापले आहेत.
शिवसेनेच्या शिंदे गटाने राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे या मथळ्याखाली दिलेल्या जाहीरातीमुळे राज्यातील राजकिय वातावरण ढवळून निघाले आहे. या जाहीरातीवर नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लागल्याने राज्यातील भाजपचे नेते नाराज झाले आहेत. तर विरोधकांनी या जाहीरातीवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो न लागल्याने टिकास्त्र सोडले आहे.
आज माध्यमांसमोर बोलताना अजित पवार म्हणाले, ” जाहिरातीत खाली ९ मंत्र्यांची माळ लावली आहे तर मग भाजपाच्या मंत्र्यांचे फोटो का नाहीत? ९ जणांची माळ लावली आहे. ९ मंत्र्यापैकी ५ मंत्र्यांवर अनेक क्षेत्रातील लोकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. या वादग्रस्त मंत्र्यांविषयी दोन दिवसांपासून माध्यमांवर सातत्याने बातम्या येत आहेत. अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न तुम्ही करताय का ? ” असा संतप्त प्रश्न अजित पवारांनी विचारला.
कालच्या जाहिरातीबद्दल अजित पवारांनी अनेक प्रश्न विचारुन त्याची उत्तरे शिंदे गटाकडून मागितली होती. त्याकडे आपला रोख करताना ते म्हणाले, “काल आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली नाहीत. भाजपाने यापुर्वी‘देशात नरेंद्र…राज्यात देवेंद्र’ ही घोषणा दिली होती…त्या घोषणेचं काय झालं? याबद्दल बोलायला तयार नाहीत” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.