मूळ राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असल्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पक्षात इनकमिंगला सुरूवात
By : सुभाष वाघमोडे
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरदचंद्र पवार असे दोन गट पडले. याचा जिल्ह्यातही परिणाम दिसून आला. सुरूवातीला अजित पवारांच्या राष्ट्रबादीत जिल्हयातील फारसे नेते, कार्यकर्ते जाण्यास तयार नव्हते. अनेकांनी सावध पावले टाकली, थांबा आणि पहा अशीच भूमिका घेतली, मात्र मूळ राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असल्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पक्षात इनकमिंगला सुरूवात झाली, मात्र यावेळी प्रमुख कोणीही पक्षात प्रवेश केला नव्हता, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि सत्तेत अजित उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाल्यापासून पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाले.
भागाच्या विकासाच्या नावाखाली आणि जुने संबध असल्याच्या कारणाने सध्या अनेकजणांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा धडाका लावला आहे. यातूनच शिराळ्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आणि त्यांचे चिरंजीव माजी जि.प. सदस्य रणधीर नाईक, अभिजित नाईक, जतेचे माजी आमदार विलासराव जगताप, खानापुर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रा अण्णा देशमुख, यांच्यासह रवी तम्माणगौडा, संग्राम जगताप, निलेश येसुडगे, आदी अनेकांनी प्रवेश केला आहे.
याशिवाय माजी आमदार अजितराव घोरपडे, यांनीही विधानसभा निवडणूकीवेळीच प्रवेश केला होता. या प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची ताकद चांगलीच वाढणार आहे. पक्षाच्या फुटीनंतर डळमळीत झालेला आणि जिल्ह्यात एकाही तालुक्यात भक्कम नसलेल्या पक्ष या नेत्यांच्या प्रवेशाने ताकदवान झाला असून याचा फायदा आगामी माजीमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी भागाच्या विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे.
या प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून आगामी जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यापैकी बहुतांशी नेते, कार्यकर्ते हे मूळ भाजपातील असून याचा फटका भाजपाला बसणार असून यामुळे दादांचे बळ आणि भाजपाच्या पाठीवर वळ अशीच परिस्थितीत दिसून येत आहे.
राष्ट्रवादी पक्षासाठी आणि अजित पवारांसाठी माजी आमदारांसह इतरांनी केलेला प्रवेश फायदयाचा असला तरी खरा फटका राज्याच्या सत्तेत एकत्रित असलेल्या भाजपाला बसणार आहे. राष्ट्रवादीत गेलेले माजी आमदार आणि इतर प्रमुख हे पूर्वी भाजपातच होते, यातील माजी आमदार विलासराव जगताप आणि रबी तम्माणागौडा हे जतेतील भाजपाचे प्रमुख होते, विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध करून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली.
या दोन नेत्यांमुळे जतेत भाजपाला थोड्याफार प्रमाणात का होईना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये फटका बसणार आहे.
माजी आमदार देशमुख हेही विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपातच होते, त्यांच्या राष्ट्रबादी प्रवेशाचा फटका भाजपाला बसू शकतो. याशिवाय भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि आमदार पडळकर यांचे कट्टर समर्थक असलेले आणि ऑल इंडिया अनिल पाटील यांनीही नुकतीच भाजपाला सोडचिट्टी देत अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
भाजपचा डाव त्यांच्याच अंगलट
विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या उमेदवारांना पराभव करण्यासाठी भाजपातील माजी खासदार संजयकाका पाटील व निशिकांतदादा पाटील यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत पाठविले. या दोन्ही मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पराभूत झाले, मात्र याचा फटका अजितदादांपेक्षा भाजपला जास्त बसला आहे. हे दोन्ही नेते अजितदादांच्या पक्षात आहेत. त्यामुळे येथील भाजपाची ताकद कमी झाली आहे. यामुळे आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढविताना विधानसभेसाठी टाकलेला डाव अंगलट येणार आहे.








