प्रतिनिधी,कोल्हापूर
कोल्हापूरात नेते आल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ,शाल दिली आणि मोठे होर्डिग्ज लावले म्हणजे पक्ष वाढत नाही.त्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळण्याची गरज आहे.त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरायला हवे.महागाई,बेरोजगारीच्या प्रश्नांवर आवाज उठवा.‘वन बुथ, ट्वेन्टी यूथ’ अशी भक्कम बुथ बांधणी करा,त्याचा पुढील बैठकीत आढावा घेतला जाईल. यामध्ये जे पदाधिकारी काम करणार नाहीत त्यांना तत्काळ बाजूला केले जाईल.संघटनात्मक बांधणीत आता लवकरच नवीन कार्यकर्त्यांना संधी देणार असून कोल्हापूर शहरासह जिह्यातील भाकरी लवकरच फिरवणार अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
विविध कार्यक्रमानिमित्त शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिह्यातील अनेक तालुक्यात राष्ट्रवादी अस्तित्वहीन झाल्याबद्दल प्रमुख नेते,पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.यावेळी आमदार हसन मुश्रीफ,माजी आमदार के.पी.पाटील, राजूबाबा आवळे, व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, बाबासो पाटील-आसुर्लेकर, आदिल फरास, मदन कारंडे, नितीन जांभळे, महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे आदी उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी कोल्हापूर जिह्यात 2 खासदार आणि 5 आमदार होते.पण आज दोनच आमदार आहेत.पक्षाच्या स्थापनेपासून आजतागायत जिह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांना पालकमंत्री पद मिळाले नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. पण आपल्याकडे आमदारकीच्या जागा किती आहेत ? आणि ते वाढवण्यासाठी आपण काय योगदान दिले ?याचाही कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे. जिल्हा राष्ट्रवादीमय होण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून काम करणे अपेक्षित आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी बूथ निहाय कमिट्या करा.त्यामध्ये सर्व समाज घटकांतील लोकांना सामावून घ्या असे आवाहन पवार यांनी केले.
मतदान यादी पाहून बूथ कमिट्या नको
बुथ कमिट्या करताना केवळ मतदार याद्या पाहून करू नका. त्यामध्ये कमिटी सदस्याचे नाव आणि फोन नंबर घ्या.मी स्वत:त्यापैकी काही सदस्यांसोबत संपर्क साधून तो खरोखरच राष्ट्रवादीचा सदस्य आहे काय ? पक्षाचे काम करण्यासाठी तयार आहे काय ? याची पडताळणी करणार आहे. यामध्ये दिलेली माहिती चुकीची आढळली तर संबंधित पदाधिकाऱ्यास तत्काळ त्या पदावरून दूर करणार आहे. युवकांचा अध्यक्ष हा युवकच हवा, तो दाढी पिकलेला नको, असेही पवार यांनी सूचित केले. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी ‘राष्ट्रवादीसाठी एक तास’ ही मोहिम प्रभावीपणे राबवा. ‘लाट’ आणि हवेवरचे राजकारण फार काळ टिकत नाही. त्यासाठी तळागाळापर्यंत पोहचून जनतेला आपलेसे करायला हवे.तरच आगामी निवडणूकांमध्ये लोक आपल्याला मतदान करतील.
बाजार समिती आणि ग्रामपंचायतींचे काही सांगू नका
बाजार समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचे इतके सदस्य आहेत असे मला सागू नका.कारण या निवडणूका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीचे अधिकाधिक उमेदवार विजयी करून रिझल्ट दाखवा.नोव्हेंबर,डिसेंबरमध्ये महानगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत.त्यानंतर लोकसभा, विधानसभा होतील. यामध्ये आपली ताकद वाढली तरच महाविकास आघाडीमध्ये चांगली संधी मिळेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तळमळीने पक्षाचे काम करावे असे आवाहन पवार यांनी केले.
मतभेद मिटवा, राष्ट्रवादीची ताकद वाढवा
कोल्हापूर जिह्यातील अनेक तालुक्यात राष्ट्रवादी क्षीण आहे.तेथे आपली ताकद वाढवण्यासाठी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपआपसातील मतभेद दूर करण्याची गरज आहे.ज्या पद्धतीने कागल तालुक्यात राष्ट्रवादी प्रबळ आहे, तशीच ताकद जिह्यात दिसायला हवी.राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे,असे पवार यांनी नमूद केले. तसेच जिह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हवे असेल तर जिह्यात किमान चार आमदार निवडूण आले पाहिजेत,असेही पवार यांनी सुचित केले.
बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक व्हा
राज्य आणि देशातील सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे.राज्यात येणारे अनेक उद्योगधंदे बाहेरील राज्यात गेले आहेत.महागाईने कळस केला आहे.घरगुती गॅससह अन्य जिवनावश्यक वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर केले आहेत.नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही.कार्यकर्त्यांनी या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर आक्रमकपणे आवाज उठवावा असे आवाहन पवार यांनी केले.
के.पी….ए.वायच मिटत नाही तोपर्यंत आबिटकरांच फावणार
राधानगरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ असला तरी तेथील दोन नेत्यांमधील वाद संपुष्ठात आला पाहिजे.के.पी.पाटील आणि ए.वाय.पाटील या दोन पाटलांच जोपर्यंत मिटत नाही, तोपर्यंत आमदार प्रकाश आबिटकर यांच फावणार.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढल्यास सध्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे असलेली विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला मागता येईल.त्यामुळे एकास विधानसभा आणि दुसऱ्याला विधानपरिषदेची जागा देता येईल असे पवार यांनी स्पष्ट केले.
कमी ताकद असलेल्या तालुक्यात लक्ष केंद्रीत करणार
गेल्या 10 वर्षात आघाडी धर्माचे पालन करताना आणि अन्य राजकीय घडामोडींमुळे जिह्यातील काही तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. आगामी काळात त्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करणार असून आगामी निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्ष नंबर वन असेल असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
दादांनी तालुकानिहाय घेतली हजेरी
ज्यांना पक्षाची पदे घेऊन काम करायचे नाही, त्यांनी तत्काळ पद सोडून बाजूला व्हावे. आम्ही दुसऱ्या कार्यकत्यांना संधी देऊ असे स्पष्ट करून मेळाव्यास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची पवार यांनी तालुकानिहाय हजेरी घेतली. यामध्ये कोल्हापूर शहरातून किती कार्यकर्ते आले आहेत, त्यांनी हात वर करा असे म्हटल्यावर अगदी चार ते पाच कार्यकर्त्यांनीच हात उंचावले. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातूनही प्रत्येकी 5 ते 10 कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी आणि राधानगरी तालुक्यातून 25 ते 30 कार्यकर्त्यांनी हात उंचावले. तर उपस्थितांपैकी तब्बल 90 टक्के कार्यकर्ते हे कागलचेच होते. अन्य तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या संख्येबद्दल अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ज्या पद्धतीने कागल तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद आहे, त्या पद्धतीने संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय झाला पाहिजे असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला.
Misha McBride looks at a formerly sunken boat now on cracked earth hundreds of feet from what is now the shoreline on Lake Mead at the Lake Mead National Recreation Area, Monday, May 9, 2022, near Boulder City, Nev. Las Vegas is being flooded with lore about organized crime after a second set of human remains emerged within a week from the depths of the drought-stricken Colorado River reservoir just a 30-minute drive from the notoriously mob-founded Strip. (AP Photo/John Locher)







