प्रतिनिधी,विटा
Sangli Political News : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे कुस्ती आखाड्यात अत्यंत शांत आणि चपळ मल्ल म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रतिस्पर्ध्याचा डाव ओळखून त्यातून अलगद बाहेर पडण्याची कसब त्यांनी लाल मातीच्या मैदानात आत्मसात केले होते. मात्र आता राजकीय आखाड्यातील आपले कसब दाखवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील दिग्गज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निमंत्रण डावलू शकले नाहीत. मात्र चंद्रहार पाटील यांनी अत्यंत शिताफीने थांबा वं पहा भूमिका घेत बैठकीला जाणे टाळले.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात गट बांधण्याची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आहे. त्यांनी काल पहिला मोठा डाव टाकत जिल्ह्यातील काही राजकीय पैलवान आपल्या आखाड्यात दाखल करून घेतले. त्याचवेळी अजित दादा गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठीही डाव टाकण्यात आला होता, मात्र चंद्रहार पाटील यांनी सध्या तरी राज्यातील राजकीय गोंधळाच्या स्थितीत थांबा आणि पाहा, अशी भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी चंद्रहार पाटील यांनी बुधवारी मुंबईला चर्चेसाठी बोलावले होते. त्यांच्या स्विय सहायकाने फोन करून चंद्रहार यांना निमंत्रण दिले. त्याचवेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पद्माकर जगदाळे आदी मंडळींना मुंबईत बोलावण्यात आले होते. ही मंडळी दाखल झाली, मात्र चंद्रहार पाटील यांनी या निमंत्रण जाळ्यात न अडकता शांत राहण्याचा निर्णय घेतला.
चंद्रहार पाटील यांचे नाव सध्या लोकसभा निवडणुकीतील प्रमुख इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत आहे. त्यांनी अधिकृत तशी घोषणा केलेली नसली तरी समर्थकांनी वाढदिवसानिमित्त डिजिटल फलकावर तेच चित्र समोर आणण्याच्या प्रयत्न केला. अशावेळी अजितदादा गटाच्या निमंत्रणानंतर त्यांचे कसब पणाला लागले. मात्र त्यांनी राजकारणातला कोणताच निर्णय गाईगडबडीत घेणार नाही, असे सांगत मुंबईला जाणे टाळले.
एकूणच भले भले राजकारणी अजितदादांच्या आमंत्रणाला अव्हेरु शकले नाहीत. त्याचवेळी चंद्रहार पाटील यांनी मात्र अत्यंत सावध भूमिका घेत सर्वांपासून समान अंतर ठेवत राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. राजकारणात सध्या तरी त्यांनी थांबा व पहा अशी भूमिका घेत प्रतिस्पर्ध्याना अंदाज येणार नाही याची दक्षता घेतली आहे.
लगेच कोणता निर्णय नाही – पै चंद्रहार
याबाबत चंद्रहार पाटील म्हणाले, अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडून मला मुंबईला बोलावण्यात आले होते. काही विषयांवर चर्चा करायची आहे, असे निमंत्रण होते. परंतू, सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कोणताही निर्णय गाईगडबडीत घ्यायचा नाही. माझे कुस्ती क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र आणि रक्तदान मोहिम या विषयावर काम सुरु आहे. त्याबाबत आवश्यकता भासली तर अजितदादांसह शरद पवारसाहेब, जयंत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन.’’








