ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी अजित पवारांसह आम्ही सर्व नेत्यांनी वाय. बी. सेंटरवर त्यांची भेट घेतली. पक्ष एकसंघ कसा राहिल यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनी आम्हा सर्वांचं म्हणणं ऐकूण घेतलं. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीनंतर सांगितले.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशापूर्वी अजित पवार गटाने वाय. बी. सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार वाय. बी. सेंटरवर असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे कोणतीही अपॉईंमेंट न घेता आम्ही त्यांना भेटायला गेलो. शरद पवार आमचे दैवत असून, त्यांचे आशिर्वाद आम्हाला हवे आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना भेटलो. त्यांना नमस्कार करत पक्ष एकसंघ कसा राहिल याचा विचार त्यांनी करावा, तसेच आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती आम्ही शरद पवारांना केली. पवारांनी या सर्व मंत्र्यांचं म्हणणं ऐकूण घेतलं. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, या मंत्र्यांच्या बैठकीनंतर आता शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची वाय. बी. सेंटरवर बैठक सुरू आहे.








