प्रतिनिधी/ पुणे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी सर्वानुमते पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. दादांनी याआधी 2006 ते 2018 या कालखंडात अध्यक्षपद भूषवून खो-खोच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य केले होते. पुण्यात 21 सप्टेंबर रोजी झालेल्या शासकीय परिषद सभेत तसेच 28 सप्टेंबर रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी असोसिएशनच्या उपाध्यक्षा अश्विनी पाटील उपस्थित होत्या. यापूर्वी अध्यक्ष असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अजितदादा पवार यांची एकमुखाने निवड करण्यात आल्याची माहिती सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली. अजितदादांच्या पुनरागमनामुळे खो-खो खेळाडू आणि क्रीडा विश्वात नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खो-खो असोसिएशन अधिक भक्कम पावले टाकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









