पुणे / प्रतिनिधी :
राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांची निवड झाल्यामुळे पुणे जिल्हय़ातील सत्ता समीकरणे बदलली असून, दादांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसत आहे. इंदापूरचा हा तिढा कसा सोडवायचा, हा पक्षशेष्ठींपुढे प्रश्न असेल.
इंदापूर मतदारसंघ हा हर्षवर्धन पाटील यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 1995 पासून 2009 पर्यंत पाटील हे येथून सातत्याने अपक्ष व नंतर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मात्र, आघाडी असतानाही पाटील यांना शह देण्याचाच अजितदादांचा कायम प्रयत्न राहिला आहे. 2014 मध्ये आघाडीत बिघाडी निर्माण झाली. त्यानंतर राष्ट्रवादीने हर्षवर्धन यांच्याविरोधात दादा समर्थक दत्तात्रेय भरणे यांना मैदानात उतरविले. भरणेंनी लावलेली ताकद व दादांची साथ यामुळे या निवडणुकीत हर्षवर्धन यांचा पराभव झाला. दरम्यानच्या काळात हर्षवर्धन यांनी भाजपाची वाट धरली व 2019 ची निवडणूक ते भाजपाच्या तिकीटावर लढले. मात्र, या निवडणुकीत भरणे व त्यांच्यात काटय़ाची टक्कर झाली. अखेर यात पुन्हा भरणे यांची सरशी झाली. तेव्हापासून हर्षवर्धन पाटील काहीसे अडगळीतच आहेत. विधान परिषदेवरही त्यांनी संधी मिळू शकली नाही. तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. राजकारणात सक्रिय झालेल्या त्यांच्या कन्येचे नावही भावी उमेदवार म्हणून घेतले जात आहेत.
अशातच अजित पवार हे भाजपा सरकारमध्ये सामील झाल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. ही जागा दादांच्या वाटय़ाला येऊन भरणे यांनाच पुन्हा तिकीट दिले जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे तेलही गेले नि तूपही गेले, अशी पाटील यांची अवस्था झाली आहे. दुसरीकडे या दोघांमध्ये पॅचअप करण्याचे प्रयोग अनेकदा झालेले आहेत. मात्र, ते यशस्वी ठरलेले नाहीत. त्यामुळे पाटील व पवार यांच्यात आगामी काळात काही तडजोड होणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.








