ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं, ही शरद पवार यांची हातोटीच आहे. पण आता अजित पवारच त्यांना संभ्रमात ठेवू लागलेत, यापेक्षा मोठी कोणती गोष्ट असू शकते, असं वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे.
सोलापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीबाबत बोलताना विखे-पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला तडे गेले आहेत. ग्रामीण भागात म्हणतो तसं हे उसणं अवसान आणण्याचा हा प्रकार आहे. त्यात आता काही अर्थ राहिलेला नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आतापर्यंत राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवत होते. पण आता अजित पवारच त्यांना संभ्रमात ठेवू लागलेत.
भविष्यात राष्ट्रवादी भाजपबरोबर येईल का, या प्रश्नावर मीडियाने छेडले असता ते म्हणाले, भविष्यात राष्ट्रवादी आमच्यासोबत येईल की नाही, हे माहीती नाही. राष्ट्रवादी इच्छूक असल्यास त्यांना बरोबर घ्यायचे की नाही, हा निर्णय पक्षपातळीवर पक्षाचे नेतेमंडळी घेतील.








