वृत्तसंस्था/ जिन्जू (कोरिया)
येथे सुरु असलेल्या आशियाई वेटलिफ्ंिटग चॅम्पियनशिप स्पर्धेत सोमवारी भारताचे वेटलिफ्टर्स अजित नारायण आणि अचिंता शेवुली यांनी पुरुषांच्या ब गटातील 73 किलो वजन गटात अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळविले.
अजित नारायण पहिल्यांदाच वरिष्ठांच्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्याने 73 किलो वजन गटात स्नॅचमध्ये 139 तर क्लिन आणि जर्कमध्ये 168 असे एकूण 307 किलो वजन उचलत ब गटात पहिले स्थान मिळविले. याच गटात भारताचा आणखी एक सहभागी झालेला वेटलिफ्टर अचिंता शेवुलीने स्नॅचमध्ये 140 तर क्लिन आणि जर्कमध्ये 165 असे एकूण 305 किलो वजन उचलत दुसरे स्थान मिळविले. विद्यमान राष्ट्रीय विजेता अजित नारायणने स्नॅचमधील पहिल्या दोन प्रयत्नात अनुक्रमे 135 आणि 139 किलो वजन उचलले. तसेच त्याने क्लिन आणि जर्कमध्ये 164 आणि 168 किलो वजन उचलले. मात्र त्याला अंतिम प्रयत्नात 171 किलो वजन उचलण्यात यश मिळाले नाही.
दुखापतीमुळे अचिंता शेवुलीला गेल्या वर्षी विश्व वेटलिफ्टींग स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. त्याने कोरीयातील या स्पर्धेत बऱ्यापैकी कामगिरी केली. मात्र त्याला क्लिन आणि जर्कमध्ये 169 आणि 171 किलो वजन उचलण्यात यश मिळाले नाही. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोलकाताच्या शेवुलीने 170 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले होते. कोरीयातील या स्पर्धेमध्ये भारतीय वेटलिफ्टर्सनी आतापर्यंत 3 पदके मिळविली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती बिंदीयाराणी देवीने 2 रौप्यपदके तसेच विद्यमान युवा ऑलिंपिक चॅम्पियन जेरेमी लालरिननुंगाने 1 रौप्य अशी एकूण 3 पदके मिळविली आहेत.









