जोशी यांची आयआयटी मद्रास, दिल्ली येथून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांनी डॉ. अजित रत्नाकर जोशी यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 मार्च 2025 पासून सुरु झाला आहे. या पदोन्नतीपूर्वी, जोशी यांनी सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभागात प्रमुख सल्लागार म्हणून काम केले आहे. कार्यकारी संचालक म्हणून, जोशी सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग तसेच वित्तीय स्थिरता विभागाचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. आरबीआयने म्हटले आहे की, अजित रत्नाकर जोशी यांची भूमिका धोरण तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सांख्यिकीय डेटाची अचूकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करणे आहे. याशिवाय त्यांना बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक स्थिरता उपायांवर देखील लक्ष ठेवावे लागेल.
तीन दशकांहून अधिक अनुभव
जोशी यांना तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. जोशी यांनी सांख्यिकी, माहिती तंत्रज्ञान आणि सायबर जोखीम व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात काम केले आहे. ते हैदराबाद येथील इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी येथे फॅकल्टी मेंबर देखील राहिले आहेत.
सांख्यिकी विषयात पदव्युत्तर
याव्यतिरिक्त, अजित रत्नाकर यांनी मॅक्रोइकॉनॉमिक्स सांख्यिकी आणि सार्वजनिक समस्यांशी संबंधित अनेक समित्या आणि कार्यगटांसोबत काम केले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी आणि आयआयटी मद्रासमधून मौद्रिक अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. अजित रत्नाकर यांनी दिल्लीतील आर्थिक विकास संस्थेतून विकास धोरण आणि नियोजनात डिप्लोमा देखील केला आहे. जोशी हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्सचे प्रमाणित सहयोगी आहेत.









