पुणे / प्रतिनिधी :
अजित पवार यांच्याशी मागच्या चार महिन्यांपासून माझा संपर्क झाला नाही किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत. मात्र, महाविकास आघाडीकडूनच अजितदादांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कर्नाटकात भाजपच निवडून येईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.
कसबा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बूथ समिती बैठक आणि संघटनात्मक शिबिरासाठी बावनकुळे पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयामुळे भाजपचा प्रयत्न पुन्हा फसला, अशी चर्चा होत आहे. मात्र, पवार यांनी राजीनामा नाटय़ ठरवून केले होते. त्यात भाजपचा कोणताही डाव नव्हता. गृहकलहातील हे एक वगनाटय़ होते. अजित पवार यांच्याशी मागच्या चार महिन्यापासून माझा संपर्क झाला नाही किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत, हेच मी सांगत होतो. महाविकास आघाडीकडूनच अजित पवारांना टार्गेट केले जात आहे.
राष्ट्रवादीत जे काही तीन दिवस झाले ते सगळे स्क्रिप्टेड होते. शरद पवार यांच्यासारख्या वलय असलेल्या नेत्याबाबत बोलणे योग्य नाही. मात्र, अध्यक्षपद टिकविण्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था आणि सहकारी कारखान्यांच्या घटनेत बदल केले, ही वस्तुस्थिती आहे. त्यासंबंधीची 50 उदाहरणे देता येतील. अध्यक्षपदासाठी घटनेत बदल करणारे पक्ष दुसऱ्या कोणाच्या हाती कसा देतील? ते अध्यक्षपद सोडणार नाहीत. हा सर्व प्रकार ठरवून केला होता, याची आम्हाला माहिती होती, असा दावाही त्यांनी केला.
जर-तरला अर्थ नाही
पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांबद्दल असे बोलू नये. आता आमदार अपात्र ठरतील की नाहीत, या जर-तरला कोणतीही अर्थ नाही. विधिमंडळात बहुमत सिद्ध करावे लागले, तर 185 पेक्षा जास्त मताने बहुमत सिद्ध होईल. पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत राहील आणि निवडणुकीनंतरही पुन्हा भाजप-शिवसेनेचेच सरकार येईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
मराठी माणसाला न्याय देण्याची भूमिका
कर्नाटकात भाजपला निवडून येण्यासाठी कुणाचीही गरज नाही. मोदींच्या नेतृत्वात आम्ही कर्नाटक जिंकू व तिथे भाजपचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी करतानाच मराठी भाषेला आणि मराठी माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका कायम आहे. पण पक्ष आणि पक्षाचा नेता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी भाजपची बी टीम असल्याच्या काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाचे खंडन करीत कर्नाटकात भाजपला राष्ट्रवादीची गरज नाही, असेही बावनकुळे यांनी सुनावले.








