ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. अजितदादांनी 40 समर्थक आमदारांच्या सह्या घेतल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र, या अफवा असल्याचे सांगत मविआच्या नेत्यांकडून या वृत्तांचे खंडन करण्यात येत आहे. अशातच आता अजितदादांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटसवरुन राष्ट्रवादीचे नाव, चिन्ह आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर हटवले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवारांच्या ट्विटर आणि फेसबुक वॉलपेपरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो आता हटविण्यात आले आहेत. त्यांच्या ट्विटर हँडलवर विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असा परिचय आहे. सोबतच फेसबुकवर टाकलेल्याच दोन्ही पोस्ट आहेत. या फोटोवर पक्षाचे चिन्ह आहे. मात्र, ट्विटरच्या पेजवर पक्षाचे नाव, चिन्ह असलेला वॉलपेपर हटवण्यात आला आहे.

त्यांच्या फेसबुक पेजचे वॉलपेपरही कोरे आहे. त्या खात्याच्या एंट्रोमध्ये विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असा उल्लेख आहे. आज या पेजवर दोन फेसबुक पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आहे. त्यामुळे अजित पवार खरंच नाराज आहेत का? नसतील तर मग पक्षाचे चिन्ह आणि नाव असलेला वॉलपेपर दोन्ही अकाऊंटसवरुन का हटवला? अशी चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.








