वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. मंगळवारी क्रिकेट सल्लागार समितीसमोर (सीएसी) त्यांची मुलाखत घेण्यात आली. आगरकर यांच्या नियुक्तीची औपचारिकता बीसीसीआय पूर्ण करणार असून विंडीज दौऱ्यातील टी-20 संघाची निवड त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या दौऱ्यात पाच टी-20 सामने होणार आहेत. ‘फक्त आगरकरच मुलाखतीसाठी उपस्थित होते. मात्र ते सध्या विदेश दौऱ्यावर असल्याने त्यांची व्हर्च्युअल मुलाखत घेण्यात आली,’ असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. या मानाच्या पदासाठी उत्तर विभागातून एकही नामांकित उमेदवार नव्हता, असेही त्यांनी सांगितले. यामुळेच पाच विभागातील एक निवड सदस्य निवडण्याची जुनी परंपरा मोडण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला आहे.
आगरकर यांच्या नियुक्तीमुळे निवड समितीत पश्चिम विभागाचे दोन सदस्य असणार आहेत. सलील अंकोला हे दुसरे सदस्य आहेत. मध्य विभागातून सुब्रोतो बॅनर्जी, एस. शरथ दक्षिण विभागाचे तर एसएस दास पूर्व विभागाचे निवड सदस्य आहेत. आगरकर यांनी भारतातर्फे 191 वनडे, 26 कसोटी व चार टी-20 सामने खेळले आहेत. 1999, 2003, 2007 वनडे विश्वचषक संघाचे ते सदस्य होते. याशिवाय 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचेही ते सदस्य होते. लॉर्ड्सवर त्यांनी एकमेव कसोटी शतक नोंदवले तर 2004 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने मिळविलेल्या कसोटी विजयात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.









