गोडोली / प्रतिनिधी :
ऐतिहासिक राजधानी अजिंक्यतारा किल्ले रस्त्याची अनेक वर्षांपासून अती दुरवस्था शिवप्रेमींना वेदनादायी आहे. या रस्त्याच्या विकसित कामासाठी जिल्हा वार्षिक नियोजनातून भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कामाची नगरपालिकेने निविदा काढताना ठेकेदाराकडे ५ हॉटमिक्स प्लॅन्ट असणाऱ्यांना आणि काही वेगळ्या अटीशर्ती पुर्ण करणाऱ्यांना काम द्यावे. हे मर्जीतील पोसलेल्या ठेकेदारासाठी राजकीय दबावापोटी ही आयडिया केली आहे. अशा अटीशर्तीत बदल करून फेरनिविदा काढा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे लेखी पत्र सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिले आहे.
ऐतिहासिक साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर जाणाऱ्या दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ योजनेतून भरीव तरतूद केली आहे. या रस्ता विकसित करण्यासाठी सातारा नगरपालिकेकडून ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केली आहे. सदरच्या निविदा प्रसिद्ध करताना ज्या अटीशर्ती ठेवलेल्या असून, त्या चुकीच्या आहेत. वास्तविक किल्ले अजिंक्यताऱ्याचा विकास गेली अनेक वर्षे रखडला आहे. आता कुठे काम होत आहे आणि त्यातच पालिकेच्या काही मर्जीतील पोसलेल्या ठेकेदारांना काम मिळावे, या शुद्ध हेतूने अटी व शर्ती ठेवल्या असल्याचे उघड सत्य असल्याचे सुशांत मोरे यांनी आरोप केला आहे.
या निविदेत ज्या ठेकेदाराकडे ५ हॉटमिक्स प्लॅन्ट आहेत, अशांनाच काम द्यावे आणि पोसलेल्या बहाद्दरांना सोईस्कर असलेल्या काही इतर अटी त्यात टाकलेल्या आहेत. या फक्त आणि फक्त राजकीय दबावाला बळी पडून मर्जीतील ठेकेदाराला कशा मिळतील. भले काम दर्जाहिन झाले तरी प्रशासनाला त्याचे देणे घेणे नाही. अशा दृष्टीकोणातून नियम व अटी ठेवलेल्या आहेत. सबब सदरच्या कामाच्या अटी व शर्तीमध्ये बदल करून फेर निविदा काढावी अन्यथा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे लेखी निवेदन देत सुशांत मोरे यांनी दिला आहे.









