वृत्तसंस्था / मुंबई
2025-26 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ड गटातील शनिवारपासून येथे सुरू झालेल्या सामन्यात छत्तीसगड विरुद्ध यजमान मुंबईने पहिल्या डावात 84 षटकात 5 बाद 251 धावा जमविल्या. अजिंक्य रहाणेने दमदार शतक तर सिद्धेश लाडने अर्धशतक झळकविले.
या सामन्यात छत्तीसगडने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. मुशीरखान आणि रघूवंशी ही सलामीची जोडी केवळ 36 धावांत बाद झाली. त्यानंतर हिमांशु सिंग खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतल्याने मुंबईची स्थिती 14 षटकात 3 बाद 38 अशी केविलवाणी झाली होती. रघूवंशीने 1 चौकारासह 9 तर मुशीरखानने 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. अजिंक्य रहाणे आणि सिद्धेश लाड या जोडीने मुंबईचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 165 धावांची भागिदारी केली. रहाणेने 237 चेंडूत 15 चौकारांसह 118 धावा जमविल्या. सिद्धेश लाडने 146 चेंडूत 13 चौकारांसह 80 धावा केल्या. दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेने आपल्या 118 या धावसंख्येवर निवृत्त झाला. सर्फराज खान केवळ 1 धावेवर बाद झाला. मुलानी 2 चौकारांसह 25 धावांवर खेळत आहे. 84 षटकात मुंबईने पहिल्या डावात 5 बाद 251 धावा जमविल्या. छत्तीसगडतर्फे आदित्य सरवटे आणि रवीकिरण यांनी प्रत्येकी 2 तर मंडलने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: मुंबई प. डाव 84 षटकात 5 बाद 251 (अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे निवृत्त 118, लाड 80, मुलानी खेळत आहे 25, रवीकिरण व अदित्य सरवटे प्रत्येकी 2 बळी).









