अध्याय एकोणतिसावा
अध्यायाच्या सुरवातीला उद्धवाने भगवंताना विनंती केली की, ब्रह्मप्राप्ती म्हणजे पर्यायाने त्यांची प्राप्ती होण्यासाठी सर्वांना सहजसाध्य, सोपे साधन कोणते ते सांगा. अशी विनंती करून एकप्रकारे उद्धवाने भगवंतांना मोकळेपणाने बोलणी करण्यासाठी संधीच दिली असेही म्हणता येईल. भक्त आणि भक्ती हे भगवंतांचे अत्यंत आवडते विषय होत. त्यावर बोलायचे म्हंटल्यावर भगवंत अत्यंत उत्साहाने बोलू लागले. ते म्हणाले, उद्धवा, सर्वाभूती समदृष्टी ठेवणे हेच माझे भजन आणि माझ्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. हे केले की, ब्रह्मसायुज्य हाती लागते पण हे साधन करण्यास सहजी कुणी तयार होत नाहीत कारण माणसाला यश, ख्याती, मानसन्मान ह्या गोष्टींचे फार आकर्षण असते. माझ्या चौथ्या भक्तीची सुरवात लहानातल्या लहान अणुरेणुलाही नमस्कार करून करायची आहे. ह्यातली प्रमुख अडचण अशी की, भक्ताने सुहृदांना बघून लोटांगण घालायला सुरवात केली की, ते त्याला हा किती खुळा आहे म्हणून जोरजोरात हसू लागतात आणि त्याची यथेच्छ टर उडवतात. म्हणून भक्ताने काय करावे, तर त्याला कुणीही ओळखत नाहीत अशा ठिकाणी जाऊन गाय, गाढव, कुत्रा ह्या सर्वांच्या ठिकाणी माझी वस्ती आहे ह्या भगवद्भावाने लोटांगण घालावे.
आता असं हे साधन जोपर्यंत आपण ज्याला नमस्कार करतोय त्याचे मनुष्य किंवा प्राणि रूप दिसायचे बंद होऊन त्या सर्वांच्यात माझे रूप दिसायला लागेपर्यंत करावं. कोणतेही कायिक, वैदिक, लौकिक कर्म करताना किंवा व्यापार करताना माझी चौथी भक्ती करणारा भक्त सतत माझेच चिंतन करत असल्याने त्या सगळ्यात त्याला माझे अस्तित्व जाणवत असते. तसेच त्याव्यतिरिक्त जे चराचर आहे त्यातही त्याला माझ्या रूपाची जाणीव होत असते. तो जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्हीपैकी कोणत्याही अवस्थेत असला किंवा कोणत्याही सुखदायी गोष्टी पहात असला, सुखाचा उपभोग घेत असला ते ते सगळे माझ्या रूपाने नटले आहे असेच त्याला खात्रीने वाटत असते. तो त्याच्या स्वभावानुसार जे जे उद्योग करतो त्यातही तो मलाच निश्चयाने पहात असतो. अशी मनाची अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी माझे भजन म्हणून सर्वाभूती भगवद्भाव ठेवावा. हे करणे अवघड वाटून मी सांगतोय तसा सर्वाभूती भगवद्भाव ठेवायचा सोडून कुणी इतर अनेक अन्य साधने करून माझी अनुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला त्यातून कणभरसुद्धा माझी प्रचीती येणार नाही. म्हणून हे सर्व लक्षात घेऊन सर्वाभूती भगवद्भजन करावे अशी माझी आज्ञाच आहे असे समजलास तरी चालेल. असे केल्यानेच माझी सहजप्राप्ती होते हे लक्षात ठेव. हाच ब्रह्मप्राप्तीचा सफल उपाय असून ही माझ्या जिव्हाळ्याची गोष्ट तू माझा अत्यंत लाडका भक्त असल्याने तुला सांगितली. हे साधन केल्याने माझा भक्त आत्मज्ञानी होऊन विरक्त होतो. त्याला हा संसार असार वाटू लागतो. संसारातील मिथ्यत्व त्याच्या लक्षात येते. संसारिक गोष्टी तसेच आप्तस्वकीय समोर दिसत असले तरी त्यांचे असणे, त्याचा उद्धार होण्याच्या दृष्टीने निरर्थक आहेत हे तो जाणतो. अशा परिस्थितीतही तो त्याचे कर्तव्य करण्यास चुकत नाही. ते तो कुणाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता पार पाडत असतो. अशा भक्ताला निश्चितच माझी प्राप्ती होते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा अनुभव त्यांच्या अभंगातून सांगितला आहे. विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर त्यांचा संसार सुफल झाला आहे आणि असे दर्शन वारंवार व्हावे असे ते म्हणत आहेत. त्यांच्या अभंगात ते म्हणतात, आजी संसार सुफळ जाला गे माये । देखियले पाय विठोबाचे? तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळो वेळा व्हावा पांडुरंग? बापरखुमादेविवरू न विसंबे सर्वथा । निवृत्तीने तत्त्वता सांगितले?
क्रमश:








