ब्रह्मज्ञानाचे सविस्तर निरुपण करून झाल्यावर त्याचा समारोप करताना भगवंत म्हणाले, उद्धवा, मी तुला ब्रह्मज्ञान जेव्हढे सोपे करून सांगता येईल तेव्हढे सोपे करून सांगितले. माझे बोलणे जो समजून घेईल त्याचे सर्व संशय जळून खाक होतील आणि तो कायमचा ब्रह्मसंपन्न आणि स्वानंदपूर्ण होईल. जो ह्या गुह्यज्ञानाचे श्रवण, पठण करेल तो धन्य होईल. उद्धवा ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे ते हा भवसागर तरुन जातील ह्यात नवल नाही पण ज्यांना ह्याबद्दल कल्पना नसते अशा भोळ्याभाबड्या, अज्ञानी लोकांच्याबद्दल विशेष आस्था बाळगून, त्यांना ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल हा प्रश्न विचारलास ह्याबद्दल तुझे मला मोठे कौतुक वाटले. तुझ्यामुळे सामान्य जनांना ह्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. ज्याप्रमाणे वासराने नुसता हुंकार द्यायचा अवकाश गायीला पान्हा फुटतो त्याप्रमाणे तुझा प्रश्न ऐकल्यावर मी स्वानंदाने संतुष्ट झालो. ज्याप्रमाणे ताह्या कासवाने कोणतीही मागणी न करता नुसतं कासवीकडे बघितल्यावर ती त्याला डोळ्यातून अमृतपान करवते त्याप्रमाणे तुझ्याकडे नुसते पाहिल्यावर माझ्या हृद्यीचे ब्रह्मज्ञान ओसंडून वाहू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणून मी हे निरुपण केले. त्या निरुपणाच्या निमित्ताने सावकाशपणे मी तुला परमामृत पाजले. हे परमामृत स्वानंदरसाने परिपूर्ण आहे. ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याने ढग तयार होतात आणि नंतर ते जगाची तहान भागवतात. जगाला समृद्ध करतात. त्याप्रमाणे उद्धवाला प्राप्त झालेले ब्रह्मज्ञान सर्व जडमूढजीवांचा उद्धार करेल. भगवंतांच्या निरुपणाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे, ज्याप्रमाणे वासराच्या प्रेमाच्यापोटी गाय इतके दुध देते की, वासराचे पोट भरून उरलेले दुध सगळ्या घरादाराला पुरते त्याप्रमाणे उद्धवाला भगवंतानी ब्रह्मज्ञान दिले आणि त्याचबरोबर सर्व जगाचे कोटकल्याण होऊन सर्वांनाच उद्धार होण्यासाठी आवश्यक ती सामग्री पुरवली. हे ब्रह्मज्ञान मिळाल्यावर मनुष्य कधी खालच्या पातळीवर येत नाही. हे सदैव चित्तात धरून ठेवल्यावर अच्युत पदाची प्राप्ती होते. भगवंतांनी उद्धवाला ब्रह्मज्ञान दिले खरे पण ते त्याने सरसकट सर्वांना न देता, ज्याची ते जाणून घेण्याची पात्रता आहे त्यालाच त्याने ते द्यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यादृष्टीने हे शुद्ध ज्ञान उद्धवाने कुणाला द्यावे ह्याबद्दल सांगताना ते म्हणाले, उद्धवा, काया वाचा आणी चित्त ज्याने मला अर्पण केले आहे, जो निरपेक्षतेने कर्तव्यकर्म करून केलेले कर्म मला अर्पण करून माझी अनन्य भक्ती करत आहे अशा भक्तांनाच मी सांगितलेल्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा. त्यामध्ये मुख्यत: जेथे जेथे त्यांचे मन जाते तेथे तेथे परिपूर्ण ब्रह्म भरलेले आहे त्यामुळे ब्रह्माची उपस्थिती नाही असे स्थानच नाही ह्या गोष्टीचा समावेश असावा. भगवंतांचे हे बोल ऐकले की, अजि मी ब्रह्म पाहिले हा अभंग आठवतो. संत अमृतराय महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात, अजि मी ब्रह्म पाहिले, अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी, खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले
चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वता, जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली, अमृतराय म्हणे ऐसी माउली, संकटा वारिले, ऐसे करिता अनुसंधान। चैतन्यीं समरसे मन भगवंतानी सांगितल्याप्रमाणे अमृतराय महाराजांना ते जिकडे जिकडे पाहतात तिकडे तिकडे त्यांना ब्रह्माची उपस्थिती जाणवू लागते. सुरवात श्री विठ्ठलाच्या मूर्तीपासून होते. मग सर्व संतांना सगुण रूप धारण करून मदत करणाऱ्या परब्रह्माची उपस्थिती त्यांना जाणवते. ते जेव्हा सर्वत्र पाहतात तेथे त्यांना परब्रह्म दिसू लागते आणि त्याच्या शिवाय कोणतीच जागा रिकामी नाही हेही त्यांना जाणवते.
क्रमश:








