वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली. प्रिती सुदान यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 29 एप्रिल रोजी युपीएससी अध्यक्षपद रिक्त झाले होते. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजय कुमार यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. युपीएससी अध्यक्षांची नियुक्ती 6 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंत केली जाते.
निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी अजय कुमार हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 23 ऑगस्ट 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत संरक्षण सचिव म्हणून काम पाहिले. त्यांनी संरक्षण प्रमुखची (सीडीएस) निर्मिती, अग्निवीर योजना, आत्मनिर्भर भारत इत्यादी अनेक महत्त्वाच्या योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयातही त्यांनी उच्च पदांवर काम केले आहे. अजय कुमार हे भारतातील सर्वात अनुभवी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. संरक्षण सचिव म्हणून त्यांनी अनेक मोठे बदल केले. त्यांनी आयुध कारखान्यांचे कंपन्यांमध्ये रुपांतर करण्यासही मदत केली.









