चौघे दरोडेखोर पूजा यांना मारहाण करत होते.
आजरा : मडिलगे येथील ग्रामपंचायत सदस्य सुशांत गुरव (वय 35) यांच्या घरावर रविवारी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत सुशांत यांची पत्नी पूजा (वय 32) यांची हत्या झाली. तर सुशांत जखमी झाले. त्यांना आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, नेहमीप्रमाणे गुरव दाम्पत्य आपल्या मुलांसोबत घरी झोपले हेते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सुशांत यांना जाग आली. ते प्रात:विधीसाठी गेले असता. घरातून त्यांच्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ आत जावून पाहिले असता.
चौघे दरोडेखोर पूजा यांना मारहाण करत होते. याला त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. पत्नीच्या अंगावरील दागिने आणि गुरव यांच्या गळ्यातील चेन त्याचसोबत घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले.
या घटनेची माहिती मिळेल तसे सकाळी 7 वाजल्यापासून मडिलगे ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.








