मंत्रीसुदिनढवळीकरयांचाखुलासा
वार्ताहर/ मडकई
शिमगोमांड गावणे येथील गरीब व असाहाय्य अंजनी गावडे व जायू या दोघा बहिणींना आपण स्वतः व माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून मिथील ढवळीकर हे पूर्वीपासून मदत करीत आहेत. ही मदत अजूनही सुरु आहे, असा खुलासा मडकई मतदार संघाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. आहे. यासंबंधी वृत्त दै. तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाले होते. रिव्होलुशनरी गोवन्स या गरीब बहिणींना मदतीचे आवाहन करुन राजकीय भांडवल करीत असल्याची टिकाही सुदिन ढवळीकर यांनी केली.
अजंनी व जायूला चतुर्थी सण साजरा करण्यासाठी लागणारी मदत केलेली आहे. यापूर्वी त्यांचे घर बांधून देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या अंतर्गत वादामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही, असे मंत्री ढवळीकर यांनी या वृत्तासंदर्भात खुलासा करताना सांगितले. 1999 साली आमदार झाल्यापासून ते 2022 पर्यंत गेल्या 23 वर्षांत माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून मडकई मतदार संघाबरोबर अन्य मतदार संघातही आपण अनेक उपक्रम राबविले. पण त्याचा कधीच गाजावाजा केला नाही. गरीबांची घरे बांधली, अनेकांच्या डोळय़ांवर ऑपरेशन करून घेतले. शैक्षणिक क्षेत्रात भरीव मदत केली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेताना कित्येकांवर मोठमोठय़ा इस्पितळातून औषधोपचार करण्याचा खर्च उचलला. पण कुठेच त्याची वाच्चता होऊ दिली नाही. त्यामुळे जायू व अजंनी यांच्याही मदतीचा गाजावाजा करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. मात्र त्यांना मदतीचे आवाहन करणारी ही बातमी प्रसिध्द झाल्याने हा खुलासा करावा लागला असे ते म्हणाले.
संबधीत मालकाचा ना हरकत दाखला घेऊन माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत त्यांचे घर बांधून देण्याचे काम मिथील करणार आहे. यापुढेही त्यांना महिन्याकाठी लागणारे रेशन व दर महिन्याला आर्थीक मदत केली जाईल. यापूर्वी अंजनी व जायुसाठी त्यांची काकी शाणे यांच्याकडे आपण मदत पाठवित होतो, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. यावेळी मंत्री ढवळीकर यांनी त्यांच्यासाठी मिठाई व अन्य मदत त्यांच्या काकीकडून पाठविली. पाण्यासाठी अंजनी व जायुची आबाळ होऊ नये, म्हणून शेजाऱयांकडे व्यवस्था केली आहे. शेजाऱयांच्या नळाचे पाणी अंजनी व जायुला देण्याची विनंती आपण आपल्या कार्यकर्त्यांमार्फत केली होती. जे वाढीव बिल येईल ते फेडण्याची तयारी दर्शविली होती. त्यांना सर्वतोपरी मदत मगो पक्षाचे कार्यकर्ते व पंचसदस्यांतर्फे करीत होतो. आरोग्य खात्यामार्फत ना हरकत दाखला घेऊन त्यांच्या घरात नळ व वीज जोडणीची सोय केली जाईल असे ढवळीकर यांनी सांगितले.
अंजनी व जायू यांची आई हयात असताना ट्रस्टमार्फत आपण त्यांना मदत करीत होतो. मात्र त्यांची आई शाणे निवर्तल्यानंतर त्यांच्या काकींमार्फत त्यांना मदत पुरविली जात होती. पंचसदस्य व्यंकटेश गावडे यांनी सांगितले की, यापूर्वी मंत्री ढवळीकर यांनी हे घर त्यांना बांधून देण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या नावे हे घर नसल्याने ना हरकत दाखल्याचा प्रश्न उपस्थित झाला. ना हरकत दाखल्या अभावी या कामात अडथळा निर्माण झाला. मध्यंतरी अंजनी व जायू बोरी येथील त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला जात होत्या. त्यामुळेही त्यांच्या घराचे काम अडून राहीले.









