नवी दिल्ली :
एअरटेल पेमेंट्स बँकेने जानेवारी 2025 पर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मवर जवळपास 1 अब्ज देवाणघेवाणीचे व्यवहार केले आहेत, अशी माहिती कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. कंपनीच्या विविध व्यवसायांमधील देवाणघेवाणीत जवळपास 47 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
एअरटेल पेमेंट्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुव्रत विश्वास यांनी म्हटले की, सध्याची आकडेवारी ही डिजिटल बँकिंग आणि अन्य व्यवहारांमधून झालेल्या कामगिरीमधील सादर करण्यात आली आहे. तसेच बँकेचे ग्राहक हे प्रामुख्याने तीन विभागात राहिले आहेत. यामध्ये खेड्यातील ग्राहक, शहरी डिजिटल व्यवहार करणारे ग्राहक आणि उद्योग तसेच संस्थांना सेवा देण्याचे कामही बँकेमधून होते यामधूनच ही बँकेची कामगिरी सरस होत असल्याची माहिती आहे.









