16 जणांचा मृत्यू : गुन्हेगारांची टोळी समजून वैमानिकाने केले फायर
वृत्तसंस्था/ अबुजा
आफ्रिकन देश नायजेरियाच्या जम्फारा राज्यात एका सैन्य हवाई हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. एका वैमानिकाने चुकून स्थानिक लोकांच्या डिफेन्स फोर्सला गुन्हेगारांची टोळी समजत गोळीबार केला होता. नायजेरियाचे सैन्य या भागात दीर्घकाळापासून गुन्हेगारांच्या टोळीशी लढत आहे.
हे गुन्हेगार गावांवर हल्ला करतात, खंडणीसाठी लोकांचे अपहरण करतात आणि मग लोकांच्या घरांना पेटवून देतात. यामुळे येथे राहणारे लोक देखील स्वरक्षणासाठी बंदुका बाळगून आहेत. गुन्हेगारांनी शनिवारी जम्फाराच्या डांगेबे गावावर हल्ला करत अनेक गुरांना लुटून नेले होते. यानंतर ग्रामस्थ बंदुकांनी गोळीबार करत या गुन्हेगारांना गावातून पिटाळून लावत परतत असताना लढाऊ विमानाने तुंगर कारा गावानजीक त्यांच्यावर गोळीबार केला.
या घटनेत 20 जणांचा मृत्यू झाल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने सांगितले आहे. तर नायजेरियाच्या अधिकाऱ्यांनी या हवाई हल्ल्याची तत्काळ आणि निष्पक्ष चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. या घटनेत जीव गमाविणाऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.
2023 मध्येही चुकून हवाई हल्ला
नायजेरियात अशाप्रकारे सर्वसामान्य लोकांवर हवाई हल्ला होण्याची ही पहिली वेळ नव्हती. 2023 मध्ये नायजेरियाच्या सैन्याने कडुना राज्यात धार्मिक सभेवर गोळीबार केला होता, यात 85 जण मारले गेले होते. याचबरोबर 2017 मध्ये एका शरणार्थी शिबिरावर झालेल्या हवाई हल्ल्यात 112 जण मृत्युमुखी पडले होते.
तेलसंपन्न परंतु अशांत देश
नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. नायजेरियाची लोकसंख्या 23 कोटी आहे. हा देश सर्वाधिक वेगाने लोकसंख्या वाढणाऱ्या देशांमध्ये सामील आहे. नायजेरियात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत, परंतु अंतर्गत संघर्षामुळे येथे सातत्याने राजकीय उलथापालथ सुरू असते. नायजेरिया दोन हिस्स्यांमध्ये विभागला गेला आहे. उत्तर हिस्सा मुस्लीमबहुल असून तेथे गरीबी अधिक आहे. दक्षिण आणि पूर्व नायजेरियात ख्रिश्चन लोकसंख्या अधिक आहे. हा भाग अधिक समृद्ध आहे.









